कौटुंबिक कलहातून एका पित्याने अगोदर स्वतःच्या दोन मुलांवर गोळ्या झाडल्या व त्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्यीची थरकाप उडविणारी घटना बल्लारपूर शहरातील भगतसिंग वॉर्डात आज सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झालेला आहे. जखमी मुलास चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मुलचंद द्विवेदी (४७) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर छातीत गोळी लागल्याने मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आकाश (२१) आहे. पवन (१५) असे गंभीर जखमी झालेल्या मुलांचे नावं आहे.
कोरोना विषाणूमुळे सर्वत्र टाळेबंदी व संचारबंदी लागू आहे. वेकोली वसाहत परिसरातील भगतसिंग वॉर्डात शांतता कायम असताना अचानक बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आवाज परिसरातील लोकांच्या कानी पडला आणि एकापाठोपाठ एक नागरिक घराबाहेर पडले. द्विवेदी यांच्या घराच्या दिशेने आवाज आल्याने सर्वांचा मोर्चा तिकडे वळला. यानंतर घरात बघितले असता मुलचंद द्विवेदी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर मुलेही रक्ताच्या थारोळ्यात दिसून आली.
घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी पवनला बल्लारपूर ग्रामीण रूग्णालयात हलवले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मृतक मुलचंद द्विवेदी व आकाश यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहेत. ही घटना कौटुंबिक कलहातूनच घडल्याची चर्चा बल्लारपुरात आहे.
मूलचंद द्विवेदी हे नागपूर येथे नोकरीला होते. करोना टाळेबंदीत बल्लारपूर येथे अडकून पडले होते. ते भाजपाचे बल्लापूर शहराचे माजी अध्यक्ष शिवचंद द्विदी यांचे भाऊ आहेत.