सांगली : जतमधील भाजपाचे माजी नगरसेवक विजय ताड यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून हत्या केल्याची घटना भरदिवसा सांगोला रस्त्यावरील अल्फोन्सा स्कूलजवळ घडली. या खूनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, मात्र, या प्रकारामुळे जत शहरासह तालुक्यात खळबळ माजली आहे. तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर ही घटना घडल्याने जिल्हा हादरला आहे.

विजय शिवाजीराव ताड शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सांगोला रस्त्यावर असलेल्या अल्फोन्सा स्कूलमधून मुलांना आणण्यासाठी आपल्या इनोव्हा (एमएच 10 सीएन 2) मोटारीतून गेले होते. महामार्गावरून शाळेच्या दिशेने वळल्यानंतर अज्ञात दोघांनी मोटारीवर गोळीबार केला. यामुळे मोटार बंद पडली. मोटारीतून खाली उतरून ते पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पुन्हा त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात जखमी होऊन जमिनीवर पडताच हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात दगड घातला. यात ते जागीच ठार झाले. भाजपमधून ते नगरपालिकेवर सदस्य म्हणून निवडून आले होते. तत्पुर्वी त्यांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला असून, भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे जत शहरासह तालुका हादरला आहे.

हेही वाचा – सरन्यायाधीशांना ट्रोल करण्याची हिंमत करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी : नाना पटोले

हेही वाचा – उत्तर प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रही उत्पादन शुल्कातून ६० हजार कोटी उत्पन्न मिळवू शकतो; सत्यजीत तांबेंचा दावा

गेल्याच आठवड्यामध्ये कोसारी येथे जमिन वादातून एका कुटुंबावर सशस्त्र हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात दोघांचा खून करण्यात आला होता, तर महिलेसह चौघेजण जखमी झाले होते. या हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट असून उप अधीक्षक आश्‍विनी शेंडगे, अधीक्षक बसवराज तेली यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाबाबत स्थानिक पोलिसांना सूचना दिल्या आहेत. या परिसरातील सीसीटीव्हीची पडताळणी करण्यात येत असून याद्बारे हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.