नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बाल शौर्य पुरस्कार देण्याची भूमिका मांडली होती. यावेळी बोलताना, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, असं ते म्हणाले होते. दरम्यान, या विधानानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून जर अजित पवारांना छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते, हे मान्य नसेल, तर त्यांची रवानगी पाकिस्तानात करावी, अशी मागणी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – >>> “सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे स्त्रीलंपट…”, जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक ट्वीट

नेमकं काय म्हणाले नरेंद्र पवार?

अजित पवारांनी संभाजी महाराजांबाबत जे विधान केलं आहे, त्यानंतर त्यांना हिंदुस्तानातून हाकलून लावलं पाहिजे. त्यांची पाकिस्तानात रवानगी केली पाहिजे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज माहिती नाही, छत्रपती संभाजी महाराज माहिती नाही. ते छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर मानायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांना इथे राहण्याचा कोणाताही अधिकार नाही. मी त्यांच्या विधानाचा निषेध करणार नाही, तर थेट त्यांना पाकिस्तानात पाठवण्याची मागणी करतो, अशी प्रतिक्रिया भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली.

हेही वाचा – >>> “मुख्यमंत्र्यांचे भाषण गल्लीतले होते” म्हणणाऱ्या राऊतांना संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “त्याला चाबरेपणा करायची सवय…”

रुपाली ठोंबरे पाटील यांनीही दिलं प्रत्युत्तर

दरम्यान, नरेंद्र पवारांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल व्यक्तव्य केलं. तसेच भाजपाच्या नेत्यांनीही महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत चुकीची विधानं केली आहेत. तेव्हा तुमच्या लोकांची जीभ छाटली होती का? आधी त्यांना पाकिस्तानात पाठवा. मग आपण अजित पवारांच्या विधानाबाबत चर्चा करू, असे त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former bjp mla narendra pawar demand that ajit pawar should be sent to pakistan after statement on sambhaji maharaj spb