महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिंदुजा रुग्णालयाने यासंदर्भात मेडिकल बुलेटिन जारी करून माहिती दिली.
हिंदुजा रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार मनोहर जोशी यांना २१ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. ते डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत.
गेल्या वर्षीही खालावली होती प्रकृती
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी २२ मे २०२३ रोजी आपत्कालीन परिस्थितीत पी.डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ते सेमिकोमामध्ये होते.
हेही वाचा >> काळवंडला तरी ‘कोहिनूर’च!
कोण आहेत मनोहर जोशी?
मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक आहेत. त्यांना जोशी सर असंही संबोधलंं जातं. मनोहर जोशी यांचं वय ८६ वर्षे आहे. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली होती. १९७६ ते १९७७ या काळात ते मुंबईचे महापौरही झाले. तर शिवसेना भाजपाच्या युतीचं सरकार जेव्हा १९९५ मध्ये आलं तेव्हा मनोहर जोशी हे मुख्यमंत्रीही झाले होते.
गेल्या काही काळापासून राजकारणात मनोहर जोशी फारसे सक्रिय नव्हते. मनोहर जोशींनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्यपदही भुषवलं आहे.
शिवसेनेच्या स्थापनेआधी, केवळ ‘कोहिनूर क्लास’चे चालक असलेल्या मनोहर जोशींना बाळासाहेबांनी एका अडचणीच्या क्षणी मदतीचा हात दिला आणि मनोहर जोशी बाळासाहेबांचे भक्त झाले. ते त्यांची सावली झाले. त्यामुळे, शिवसेनेच्या वाटचालीतील प्रत्येक पायरीवर, बाळासाहेबांशेजारी मनोहर जोशी यांना पाहण्याची शिवसैनिकांना जणू सवयच होऊन गेली होती.
इतके ‘अंतर्बाह्य शिवसैनिक’ असलेल्या मनोहर जोशींनाच, शिवसेनेचे अंतरंग, शिवसैनिकाची नस नेमकी माहीत असणार, असा सगळ्या मराठी मानसाचा समज होता. त्यामुळेच, शिवसेनेवर बोलण्याचा एकमेव अधिकार त्यांच्याकडे सहजपणे चालून आला होता. त्यातूनच त्यांनी शिवसेनेवर संशोधन प्रबंध लिहिला आणि चिकित्सा करण्याची हिंमतही न दाखविता त्यांना मुंबई विद्यापीठाने त्यावर डॉक्टरेट बहाल केली. शिवसेनेच्या इतिहासाचा आणि वर्तमानाचा एक ऐतिहासिक दस्तावेज डॉ. मनोहर जोशी यांनी निर्माण केला. ‘शिवसेना- काल, आज आणि उद्या’ या नावाचा एक हजार पानांचा हा शोधनिबंध म्हणजे, शिवसेना आणि मनोहर जोशी यांच्या एकत्रित वाटचालीचा ऐतिहासिक साक्षीदारही ठरला..