कराड : देशातील समता, मानवता तोडण्याचा मूठभर लोकांचा डाव असून, त्यात नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे दिसत असलातरी खरा बोलवता धनी हा आरएसएसच असल्याचा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पंतप्रधान मोदी हे पराभवाच्या भीतीने लोकसभा निवडणुक मुदतपूर्व घेतील अशीही टीका चव्हाण यांनी केली.काँग्रेसचच्या जनसंवाद पदयात्रेनिमित्त शेरे (ता. कराड) येथे जाहीर सभेत ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, जिल्हा सरचिटणीस पहिलवान नानासाहेब पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात वर्षभरात अनेक स्थित्यंतरे होतील. व पुढील काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुकाही आहेत. तरी केंद्रातील मोदी सरकार विरोधी पक्षांना बेसावध ठेवून मुदतीआधी निवडणुका घेतील. दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. हे नजरेआड करून पाच राज्ये आपल्या हातातून जातील, या भीतीने मोदी लोकसभेच्या निवडणुका मुदतीआधी घेण्याची शक्यता आधिक आहे.पण देशात लोकशाही अस्तित्वात आहे, देशात राज्य कोणी करायचे, हे तुम्ही जनताच ठरवाल असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

सध्या देशात लोकशाही राहते की, नाही यात शंका वाटते. नरेंद्र मोदींची पावले त्या दिशेनेच चालू आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधान आपणच व्हावे, याकरिता ते इतर हुकुमशाही देशांचे अनुकरण करत एक देश एक निवडणूक ही पद्धत आणतील असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.काँग्रेसने माणूस म्हणून प्रत्येकाला वागणूक दिली. गुलामगिरीतून हा देश बाहेर काढून महासत्ता करण्याची शक्ती देशाच्या घटनेत आहे. हेच संविधान नसतेतर ब्रिटिश गेले असते. आणि वर्ण व्यवस्था कायम राहिली असती. आज केवळ सत्ता हवी म्हणून त्यामागे आपली माणसे धावत आहेत. यशवंतराव मोहिते यांच्या विचारधारेला जी मंडळी सोडून गेली, याचे दुर्दैव वाटते अशी खंत चव्हाणांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>>उद्यापासून पुन्हा कांदा कोंडी? केंद्राच्या धोरणास विरोध, लिलावापासून दूर राहण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय

मी मंत्री असेल तरच विकास होईल. असे काही नेते सांगतात. पण विकास समाजाचा की, स्वतःचा करायचा? तुरुंगातून बाहेर यायचे होते का? असा सवाल त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केला.राज्यातील विश्वासघाती सत्तेला जनता कधीही आशीर्वाद देणार नाही. गद्दार व लाचारांचे राज्य झाल्याचे वाईट वाटते. खोकी घेवून सरकार पाडले. पण आता तुम्ही निवडणुका घ्या. जनता तुम्हाला जागा दाखवेल.

सत्तेसाठी नरेंद्र मोदी कोणत्याही थराला जातील. केंद्र सरकारने अब्जावधी रुपये जाहिरातीवर खर्च करूनही सामान्य लोकांच्या परिस्थितीत फरक पडलेला नाही. केंद्र सरकारने देशाच्या मालकीच्या मालमत्ता विकल्या. व काहींचे खाजगीकरण केले. रेल्वेची ९० हजार हेक्टर जमीन लिलावात काढली असल्याची जोरदार टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.अजितराव पाटील-चिखलीकर यांनी माजी आमदार आनंदराव पाटील व डॉ. अतुल भोसले यांच्यावर टीका केली. ज्येष्ठ विचारवंत व माजी मंत्री यशवंतराव मोहिते यांनी अख्खा महाराष्ट्र अंगावर घेतला. पण, त्यांच्याच घरात आरएसएस घुसली. व ज्या माणसाने चुलत्याला गंडवले आणि त्याच गद्दाराचे कराडमध्ये स्वागत झाले, या दोन गोष्टींचे वाईट वाटते. कुंकू लावा आणि मला सुहासिनी म्हणा, अशी अवस्था एकनाथ शिंदे आणि अजितदादांची झाली आहे.

हेही वाचा >>>कोकणच्या एसटी फेऱ्यांवर शिंदे पितापुत्रांची छाप; ठाणे विभागातून एक हजार बसगाडय़ांची नोंदणी

अजितदादा म्हणतात, लोकांच्या विकासासाठी सत्तेत गेलोय. मग ते आजपर्यंत काय बारामतीत गवत उपटत होते का? पृथ्वीराजबाबांनी मुख्यमंत्री असताना सिंचन घोटाळ्याला सुरुंग लावला. ती आग अजूनही धुपत आहे. राज्यात सत्तेतील गद्दारांची वरात काढून त्यांना यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या समाधीस्थळावर न्या. भाजपने हसन मुश्रीफ यांना ईडीची भीती दाखवली. त्यांना “कराड दक्षिणम’धील बाळ दिसले नाही का? असे डॉ.अतुल भोसले यांना निक्षून चिखलीकर म्हणाले.

तर कराडात गद्दाराचे स्वागत आपल्यातील एका गद्दाराने केले, अशी टिका माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यावर त्यांनीं केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयास १२० विद्यार्थ्यांच्या जागा वाढवून दिल्या, याची जाण भोसलेंना नाही अशीही टीका चिखलीकरांनी केली. ॲड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, शिवराज मोरे आदींचीही भाषणे झाली.

Story img Loader