सोलापूर : विधानसभा निवडणुकीपासून सोलापुरात काँग्रेस पक्षाला लागलेली गळती थांबायचे नाव घेईना. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी कोणतेही कारण न देता पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशाची घोषणा त्यांच्या समक्ष भाजपचे आमदार विजय देशमुख यांनी एका कार्यक्रमात केली. सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाची स्थिती ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी झाली आहे.
वीरशैव लिंगायत समाजातून आलेले प्रकाश वाले हे २०१७ पासून सलग सात वर्षे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्यावर पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची मर्जी होती. तत्पूर्वी, १९९७ साली सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर ते नगरसेवक झाले होते.
दिवंगत गांधीवादी नेते वि. गु. शिवदारे संस्थापित पन्नास वर्षांपासून यशस्वी वाटचाल करणाऱ्या श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून प्रकाश वाले यांनी अनेक वर्षे काम पाहिले आहे. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षासह महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यापासून स्वतःला दूर ठेवले होते. पाच वेळा विधानसभेवर निवडून आलेले भाजपचे आमदार विजय देशमुख यांच्याशी गेल्या तीन वर्षांपासून वाले यांची सलगी वाढली होती.
स्थानिक नेतृत्वाला दोष
काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचे नमूद करताना वाले यांनी कोणाचाही थेट नामोल्लेख न करता स्थानिक नेतृत्वाला दोष दिला. शहर व जिल्ह्यात पक्षाची सूत्रे खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे आहेत. प्रकाश वाले यांचा रोख खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा…पंढरपूर: पवार कुटुंबातील वाद संपून एकत्र येऊ दे ; अजितदादांच्या आईचे विठ्ठलाला साकडे
पक्ष सोडण्याची मालिका
वर्षानुवर्षे काँग्रेसच्या पाठीशी राहिलेल्या अनुसूचित जातींपैकी मोची समाजातील पाच माजी नगरसेवकांसह पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून बाहेर पडत थेट भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर मुस्लिम समाजातीलही काही माजी नगरसेवकांसह क्रियाशील कार्यकर्त्यांनी काँग्रेसची साथ सोडत एमआयएम पक्षात जाणे पसंत केले होते. ही गळती रोखण्याच्या दृष्टीने पक्षाचे स्थानिक नेतृत्व बेफिकीर राहिल्याचे बोलले जात असताना, आता माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनीही अपेक्षेप्रमाणे पक्षातून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.