EX Chief Minister of Maharashtra Manohar Joshi Death : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे आज पहाटे (२३ फेब्रुवारी) तीनच्या सुमारास वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. मनोहर जोशी यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशींना श्रद्धांजली व्यक्त करत असताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Manohar Joshi : भिक्षुक, बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक ते राज्याचे मुख्यमंत्री; जोशीसरांचा संघर्षमय प्रवास

मनोहर जोशी संकटकाळातही शिवसेनेबरोबर राहिले

शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मनोहर जोशींना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, “मनोहर जोशी सच्चे शिवसैनिक होते. बेळगाव-कारवार सीमा आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली, तेव्हा त्यांच्यासह मनोहर जोशी आणि दत्ता साळवीही होते. जीवाला जीव देणारे निष्ठावंत शिवसैनिक आपल्यातून निघून जात आहेत, हे आपले दुर्दैव आहे. मी आता मुंबईला निघालो आहे. शिवसेना परिवाराच्या वतीने मनोहर जोशींना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते. मनोहर जोशी पहिल्या फळीतील शिवसैनिक होते. जोशी यांच्यासारख्या जीवाला जीव देणाऱ्या शिवसैनिकांमुळे शिवसेना अनेक संकटावर मात करून वेळोवेळी उभी राहिली.

Manohar Joshi : रामजन्मभूमी आंदोलनात मनोहर जोशींचा सहभाग; श्रद्धांजली व्यक्त करताना संजय राऊतांची भाजपावर टीका

कडवट, सच्चे शिवसैनिक – एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘एक्स’वर पोस्ट टाकून श्रद्धांजली व्यक्त केली. ते म्हणाले, “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रचंड निष्ठा असलेले आणि त्यांना अपेक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी मनापासून योगदान देणारे एक शिस्तबध्द आणि खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.”

“महाराष्ट्र, मराठी माणसाविषयी त्यांना मनापासून आत्मीयता होती. महाराष्ट्राच्या राजकारणातला अभ्यासू आणि सुसंस्कृत चेहरा ही त्यांची ओळख. सर, अतिशय नम्र, संयमी, हजरजबाबी आणि शिस्तप्रिय होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील त्यांची कामगिरी, योगदान आमूलाग्र बदल घडवणारे होते. शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना तळमळ होती. त्यामुळेच कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना शिक्षणाकडे वळवले”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न मनोहर जोशींच्या रुपाने..”, राज ठाकरेंची आदरांजली

महायुतीचे नेतृत्व केले

“शिवसेना – भाजप युतीच्या सरकारचे नेतृत्व सरांनी केले. सर्वांना सोबत घेऊन, भूमिकांचा आदर करून वाटचाल करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवरील कामाचा त्यांना दांडगा अनुभव होता. शिवसेनेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला लाभली, हे मी माझे भाग्य समजतो. आज आपण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला एक कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला आहे. सरांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जोशी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत”, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cm manohar joshi dies cm eknath shinde and uddhav thackeray express condolance kvg
Show comments