मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण या तिन्ही नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत अनुक्रमे शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपात प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी धक्का मानला जात आहे. तसंच, काँग्रेसचे अनेक नेते इतर पक्षाच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपमही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. या चर्चांवर संजय निरुपम यांनी उत्तर दिलं आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसचे अनेक नेते काँग्रेस सोडून इतर पक्षात जात आहेत यामागची कारणं काय आहेत? असा प्रश्न संजय निरुपम यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “यामागे अनेक कारणं आहेत. पण आता जाऊदे. परंतु, मी जात नाहीय.” यावर तुम्हीही इतर पक्षात जात आहात, अशी चर्चा आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय निरुपम म्हणाले, “मी इतर पक्षात जाणार असल्याच्या अफवा सुरू आहेत. एक व्यक्ती गेला की बाकी सर्वांबाबत अफवा पसरतात. आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत. आम्ही जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहोत. आणि यापुढेही काम करत राहणार आहोत”, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

हेही वाचा >> “उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह पुन्हा मिळू शकतं”, SC च्या वकिलांनी केलं स्पष्ट; म्हणाले…

दरम्यान, संजय निरुपम यांची मिलिंद देवरा, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात आहे. याबाबत ते म्हणाले, “माझी कोणाबरोबरच चर्चा झाली नाही. मी चॅलेंज देतो की माझी कोणाबरोबरच चर्चा झाली नाही. अफवा पसरवू नका.”

ठाकरे गटाकडून आघाडीच्या नियमांचं उल्लंघन

शिवसेनेकडून मुंबईत चार मतदारसंघात दावा केला आहे. याबाबत संजय निरुपम म्हणाले, “शिवसेनेकडून चुकीचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या तीन बैठका झाल्या आहेत. या बैठकीत अद्यापही जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. २२ तारखेला काँग्रेसची निवडणूक समितीची बैठक आहे. जोपर्यंत अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाकडून दावा करणं चुकीचं आहे. हे कोणत्याही आघाडीच्या नियमांचं उल्लंघन आहे”, असं म्हणत संजय निरुपम यांनी ठाकरे गटाला घरचा आहेर दिला आहे.

संजय निरुपमांच्या भाजपा प्रवेशाबाबत गजानन कीर्तिकर काय म्हणाले?

“संजय निरुपम यांनी ज्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे, तो शिवसेनेचा आहे. युतीच्या वाटपात तो भाजपाचा नाही, हे सर्वांत महत्त्वाचं. संजय निरुपम यांची पुन्हा खासदार होण्याची इच्छा पूर्ण होणार नाही. कारण, बिहारमधील एक बेरोजगार तरुण, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पत्रकारिता पूर्ण केली नाही. आणि मुंबईच्या वाट्याला आला नोकरी शोधायला आणि सामनामध्ये लागला. त्यामुळे बाळासाहेबांच्या जवळ गेला आणि खासदार झाला. त्यांच्याच सांगण्यामुळे कृत्य केले म्हणून राजीनामा दिला. आयुष्यात ते खासदार होणार नाहीत. ते काय एवढा मोठा नेता नाहीत. इलेक्टिव्ह मेरिट नाही की भाजपाने त्याला घ्यावं. भाजपा चांगल्या नेत्यांना घेत असतं. त्याला काँग्रेसमधून आता संधी नाही. उत्तर पश्चिममधून २०१९ ला मी त्याला पावणे तीन लाखांनी हरवलं होतं. कोणत्याही पक्षाकडून त्याने तिकिट मिळवून दाखवावं. रिंगणात यावं. यावेळी मी त्याला साडेतीन लाखांनी हरवणार”, असं आव्हानच गजानन कीर्तिकर यांनी दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former congress mp sanjay nirupam also on the way to bjp responding when a person goes sgk
Show comments