माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने सोलापुरात हळहळ व्यक्त होत असून यानिमित्ताने १९९९ ते २००३ च्या सुमारास आर. आर. आबा यांनी सोलापूरचे पालकमंत्री म्हणून सांभाळलेली जबाबदारी, विशेषत: २००२ साली उसळलेली जातीय दंगल काबूत येण्यासाठी त्यांनी सोलापुरातच ठाण मांडून पार पाडलेली कामगिरी, त्यांच्यातील संवेदनशीलता आणि कर्तव्यकठोरतेला उजाळा मिळाला.
राज्य विधिमंडळात यापूर्वी आदर्श संसदपटूचा पुरस्कार मिळविलेले आर. आर. पाटील यांचा सोलापूरकरांबरोबरचा संबंध ते पालकमंत्री झाल्यानंतर विशेषत्वाने आला. १९९९ साली युतीची सत्ता जाऊन विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार आल्यानंतर आर. आर. पाटील हे ग्रामविकासमंत्री झाले आणि त्याचवेळी सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. अतिशय सुज्ञ, संयमी, शांत, अभ्यासूवृत्ती अंगी लाभलेले आर. आर. आबा हे थोडय़ाच दिवसांत सोलापूरकरांसाठी आदरणीय व्यक्तिमत्त्व ठरले. जिल्हा नियोजन समितीच्या सभा वेळच्या वेळी घेऊन जिल्ह्य़ाच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच सतर्कता दाखविली होती. त्यांचा कारभार आणि प्रत्यक्ष वर्तन पारदर्शक असल्यामुळे अधिकारीवर्गातही शिस्त होती.
दुर्दैवाने ११ सप्टेंबर २००२ रोजी सोलापुरात अचानकपणे जातीय दंगल उसळली. ही दंगल नियंत्रणात येत नसल्याचे पाहून आर. आर. आबा त्याच दिवशी रात्री सोलापुरात धावून आले व संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेतली. रात्री शासकीय विश्रामगृहात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांचे संपादक व पत्रकारांशी संवाद साधून सहकार्य मागितले. त्याचवेळी भडक बातम्यांचे चित्रण दाखविणाऱ्या एका स्थानिक वृत्तवाहिनीला आर. आर. आबांनी प्रेमाने समज दिली. दंगलीच्या काळात संचारबंदी असताना काही ठिकाणी दंगल होत असल्याचे पाहून ते प्रत्यक्ष दंगलीच्या ठिकाणी धावून गेले. चाटी गल्ली, भुसार गल्लीत एका भुसार दुकानातून धान्याची पोती पाठीवर नेली जात असल्याचे चित्र पाहून आर. आर. आबा व्याकुळले. कारण धान्य लुटणारे तरूण गरीब कुटुंबीयातील होते. पोलिसांनी त्यांना लाठय़ा मारल्या. त्यांनी पोटासाठी धान्य लुटल्याचे लक्षात येताच आर. आर. आबा यांच्यातील संवेदनशीलता एकीकडे दिसत असताना दुसरीकडे त्यांच्यातील प्रशासकही जागा झाला होता. त्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची अक्षरश: कानउघाडणी केली. एवढेच नव्हे तर स्थानिक पोलीस ठाण्यातील प्रभारी पोलीस अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्याचे आदेशही दिले होते. एकाचवेळी संवेदनशीलता आणि कर्तव्यकठोरता हे गुण आर. आर. आबांच्या ठायी दिसून आले होते. नंतर पालकमंत्रिपदावरून दूर झाल्यानंतरदेखील त्यांनी सोलापूरकरांशी लावलेला लळा कायम टिकून राहिला.

Story img Loader