कराड : तपास यंत्रणांचा गैरवापर वाढला असून, त्यातून विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करताना, केवळ राजकीय विरोधकांना त्रास देणे सुरू आहे. अशा पद्धतीचे गलिच्छ राजकारण अतिशय दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपचा नामोल्लेख टाळत केली. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचे ते म्हणाले.
कराडमध्ये पत्रकारांशी देशमुख बोलत होते. मला खोट्या गुन्ह्यात अडकवून छळ करण्यात आला. सुरुवातीला माझ्यावर शंभर कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप होता. मात्र, प्रत्यक्ष आरोपपत्रात १ कोटी ७२ लाख रुपयेच नमूद करण्यात आले. खासदार संजय राऊत यांनाही तुरुंगात टाकण्यात आले. हसन मुश्रीफ यांच्या मागेही ससेमिरा होता. आता जयंत पाटील यांना हा त्रास दिला जात असल्याचा आरोप देशमुखांनी केला. आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गैरवापराबाबत राष्ट्रपतींना देशभरातील विरोधी पक्षांनी दिलेल्या निवेदनाला काय प्रतिसाद मिळतो हे महत्वाचे असल्याचे देशमुख म्हणाले.
पवारच दूरदृष्टीचे नेते
यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच खऱ्याअर्थाने दूरदृष्टीचे नेते असल्याचा दावा शेतकरी नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे. त्याबाबत विचारले असता सदाभाऊंचे राजकीय ज्ञान फार अपुरे दिसते. देशात शरद पवारांसारखे प्रचंड ज्ञान कोणाचे नसल्याचा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीच मोठा भाऊ
आमच्यात पूर्वी काँग्रेसचे आमदार जास्तीचे असताना ते मोठे भाऊ होते. आता राष्ट्रवादीची संख्या मोठी असल्याने आम्हीच मोठे भाऊ असल्याचे सांगत देशमुख यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचे समर्थन केले.
नोटबंदीवर उत्तर का नाही
यापूर्वीच्या नोटाबंदीने सर्व समाजाला त्रास झाला. दोन हजाराची नोटबंदी का झाली यावर ठोस उत्तर मिळत नाही. तरी, कोणत्या अर्थतज्ज्ञाच्या सल्ल्याने ही नोटबंदी झाली ते लोकांसमोर आले पाहिजे अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली.