परभणी : येथे तीन महिन्यांपूर्वी न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एक सदस्यीय समितीचे कामकाज सुरू झाले आहे. या कामकाजासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही.एल. आचलिया यांचे आज मंगळवारी (दि.४) शहरात आगमन झाले.

शहरात दिनांक १० डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली होती. या घटनेनंतर बंद दरम्यान शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले. आपल्या मुलाचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला अशी भूमिका सोमनाथची आई व त्याच्या सर्वच कुटुंबीयांनी घेतली. याप्रकरणी सेवानिवृत्त न्यायमूर्तींची एक चौकशी समिती नेमण्यात येणार असल्याचे त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले होते. त्यानुसार घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने शासन निर्णय दि. १५ जानेवारी २०२५ अन्वये सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही.एल. आचलिया यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे.

आज आचलिया यांचे येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधिक्षक, म.न.पा आयुक्त, अपर पोलीस अधिक्षक, जिल्हा सरकारी वकील यांच्याशी दिवंगत सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणाची प्राथमिक चर्चा केली. तसेच या कालावधीतील सर्व घटनांची प्राथमिक माहिती त्यांनी घेतली. आचलिया यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाशेजारील संविधान प्रतिकृती शिल्पाच्या विटंबना झालेल्या ठिकाणी व नवा मोंढा पोलीस स्टेशन येथे आज भेट देवून पोलीस स्टेशनमधील कार्यवाहीबाबत माहिती घेतली असून त्यांचे चौकशीचे कामकाज सुरु झाले आहे. या पाहणी दरम्यान जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक यशवंत काळे आदी अधिकारी हजर होते. या प्रकरणाचे चौकशी कार्यालय हे येथील वसमत रस्त्यावरील विश्राम गृह हे राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

Story img Loader