परभणी जिल्ह्याच्या राजकारणावर ठसा उमटविणारे ज्येष्ठ नेते शेषराव देशमुख यांचे रविवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी ते ८५ वर्षांचे होते. सोमवारी (दि. १८) नांदखेडा रोडवरील शेतात त्यांच्या पाíथवावर सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
संपूर्ण हयात शेतकरी कामगार पक्षात घालविणाऱ्या देशमुख यांची ओळख परभणी शहरात ‘भाऊ’ या नावानेच होती. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी राजकीय वर्तुळात शेवटच्या क्षणापर्यंत आदराचीच भावना होती. स्वतचा दबदबा त्यांनी कायम ठेवला. परभणी शहराचे आजचे विकसित स्वरूप घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. म्हणून त्यांना परभणीचे शिल्पकार असेही संबोधले जात होते. शहराच्या वैभवात भर घालणारे नटराज रंगमंदिर, स्टेडियमचे व्यापारी संकुल अशी अनेक महत्त्वाची कामे त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकीर्दीत झाली होती. त्यांच्याच काळात शहरात पायाभूत सुविधांचा विकास झाला.
आमदार, खासदार अशी राजकारणातली महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली. सहकारातही त्यांनी स्वत:चा नावलौकिक निर्माण केला. १९६२ साली ते पहिल्यांदा परभणी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. यावेळी ते परभणी शहराचे उपनगराध्यक्ष होते. १९६७ साली जिंतुर विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र याच मतदारसंघातून १९७२ साली ते आमदार झाले. १९७७ साली ते जिल्ह्याचे खासदार झाले. थेट नगराध्यक्षपदाची जी निवडणूक झाली त्यात ते १९७४ साली नगराध्यक्ष झाले होते. महाराष्ट्र राज्य गृहवित्त मंडळाचे ते काही काळ अध्यक्षही होते. शिखर बँकेवरही त्यांनी प्रतिनिधित्व केले. जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वष्रे राहूनही त्यांची राजकीय कारकीर्द अत्यंत निष्कलंक राहिली. प्रदीर्घ काळ राजकारणात राहूनही त्यांच्यावर एकही आरोप विरोधक करू शकले नाहीत. अत्यंत स्वच्छ प्रतिमेचा राजकारणी अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त परभणीत भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वयाच्या ८१व्या वर्षी सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त येथील शनिवार बाजारात त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला होता. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. तरीही शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात त्यांची आवर्जून हजेरी होती. आज दुपारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना वसमत रस्त्यावरील जवादे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. याच ठिकाणी सायंकाळी ५.४५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी उशिरा त्यांच्या देशमुख गल्लीतील निवासस्थानी नागरिकांची अंत्यदर्शनासाठी रिघ लागली. सर्वसामान्य माणसापासून ते जिल्ह्यातल्या मातब्बर नेत्यांपर्यंत सर्वानीच त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
परभणीचे माजी खासदार शेषराव देशमुख यांचे निधन
परभणी जिल्ह्याच्या राजकारणावर ठसा उमटविणारे ज्येष्ठ नेते शेषराव देशमुख यांचे रविवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सोमवारी (दि. १८) नांदखेडा रोडवरील शेतात त्यांच्या पाíथवावर सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

First published on: 18-05-2015 at 01:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former m p sheshrao deshmukh death