सोलापूर : सोलापूरचे माजी खासदार धर्मण्णा मोंडय्या सादूल (वय ८०) यांचे आज सकाळी पावणेबाराच्या सुमारास एका खासगी रूग्णालयात आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शहराच्या पूर्व भागातील विणकर पद्मशाली समाजातून आलेले धर्मण्णा सादूल हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. १९८९ सालची सार्वत्रिक आणि १९९१ सालच्या मध्यावधी लोकसभा निवडणुकीत सादूल हे काँग्रेस पक्षातर्फे सोलापूर मतदारसंघातून निवडून आले होते. अलिकडे त्यांनी वृध्दापकाळात प्रकृती साथ देत नसतानाही काँग्रेस पक्षातून बाहेर पडत तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश केला होता. मात्र या पक्षातही ते सक्रिय नव्हते.
सादूल हे १९८९ साली महापौर असताना त्याच वर्षी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना काँग्रेसने सोलापुरातून संधी दिली होती. त्यावेळी दिवंगत झुंजार संपादक रंगाआण्णा वैद्य यांनी तिस-या आघाडीतर्फे आव्हान दिले असता त्यावर मात करून सादूल हे निवडून आले होते. त्यानंतर १९९१ सालेल्या लोकसभा मध्यावधी निवडणुकीतही सलग दुस-यांदा ते निवडून आले होते. मात्र पुढे १९९६ सालच्या लोकसभा निवडणुकीत चुरशीच्या तिरंगी लढतीत ते थेट तिस-या स्थानावर फेकले गेले होते. खासदार असताना त्यांचा तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्याशी संपर्क वाढला होता. त्यांना मंत्रिपदाची संधी चालून आली असता एका बड्या नेत्याच्या पक्षांतर्गत विरोधामुळे ऐनवेळी मंत्रिपद हुकले होते. एका सामान्य कुटुंबातील धर्मण्णा सादूल यांनी तरूणपणी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात उतरल्यानंतर प्रथम १९७४ साली सोलापूर महापालिकेवर निवडून गेले होते. त्यानंतर १९८५ साली पुन्हा निवडून आले असता त्यांना महापौरपदाची संधीही मिळाली होती. तत्पूर्वी, सुरूवातीच्या काळात तत्कालीन ज्या सोलापूर जिल्हा सहकारी उद्योग बँकेत ते कर्मचारी होते, त्याच बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले होते.