अहिल्यानगरः शिवसेनेच्या ठाकरे गटाला अहिल्यानगर जिल्ह्यात लागलेली गळती थांबायला तयार नाही. दोन महिन्यांपूर्वी माजी महापौरांसह काही माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. आज, बुधवारी पुन्हा ठाकरे गटातील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य, सभापतींसह संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दुपारी जथ्थ्याने मुंबईकडे रवाना झाले.

रवाना झालेले पदाधिकारी आज रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.  त्यामध्ये उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले, जिल्हा परिषद माजी सदस्य शरद झोडगे, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, माजी सदस्य दिलीप पवार व गुलाब शिंदे, उपजिल्हाप्रमुख अशोक दहिफळे, एसटी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुरेश शिरसागर, उपशहर प्रमुख विठ्ठलराव जाधव, भारतीय कामगार सेनेचे शरद शेडाळे, वाहतूक सेनेचे संजय आव्हाड, उपतालुकाप्रमुख प्रकाश कुलट, घोसपुरीचे सरपंच विठ्ठल हंडोरे, भोरवाडी सेवा संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भोर, भोरवाडीचे माजी सरपंच नवनाथ वायाळ, भोईरे पठारचे माजी सरपंच बाबासाहेब टकले अशा पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी इच्छुक होते. तशा हालचाली सुरू होत्या. मात्र ठाकरे गटाकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला नाही.

हे सर्व पदाधिकारी अहिल्यानगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार करून शिंदे गटातील प्रवेशासाठी मुंबईकडे रवाना झाले यावेळी शिंदे गटाचे पदाधिकारी सचिन जाधव, अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाले, दिलीप सातपुते, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे आदी उपस्थित होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत निर्माण झालेली नाराजी ठाकरे गटाला सातत्याने खिंडार पाडू लागली आहे.

विधानसभा निवडणुकीत पक्षाने जागा वाटपात अन्याय केला, अनुकूल वातावरण असूनही काही मतदारसंघ महाविकास आघाडीतील इतर पक्षांना सोडण्यात आले. पदाधिकाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाकडे पक्षातील प्रमुख नेत्यांनी दुर्लक्ष केले. कार्यकर्त्यांचे म्हणणे सातत्याने त्यांच्या कानावर घालण्यात आले. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे तसेच विकास कामे मार्गी लावण्यासाठी शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच अहिल्यानगर शहरातील माजी महापौर व माजी नगरसेवकांच्या गटाने शिंदे गटात प्रवेश केला. त्याहीपूर्वी माजी नगरसेवकांचा एक गट ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात दाखल झालेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ठाकरे गटाला सातत्याने खिंडार पडत आहे. जिल्ह्यात ठाकरे गटाचा एकही आमदार विधानसभा निवडणुकीत निवडून आलेला नाही. जिल्ह्याच्या उत्तर भागात शिर्डी मतदारसंघातून खासदार म्हणून भाऊसाहेब वाकचौरे निवडून आले. मात्र त्यांच्याकडूनही पदाधिकाऱ्यांना थांबवण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत.