गडचिरोली येथील सुनावणी रद्द करा

गडचिरोली : जिल्ह्य़ातील बहुचर्चित सूरजागड लोहखाणीतील उत्खनन क्षमता वाढवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासंदर्भात पर्यावरणविषयक जनसुनावणी एटापल्ली येथे घेण्यात यावी व गडचिरोली येथे २७ ऑक्टोबर रोजी होणारी सुनावणी रद्द करावी, अशी मागणी माजी मंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

हेही वाचा >>> “…तेव्हा मोदींनीच सर्वात जास्त विरोध केला होता”, ‘त्या’ प्रकरणावरून शरद पवारांनी दिल्या कानपिचक्या

एटापल्ली तालुक्यातील सूरजागड पहाडावर सुरू असलेले लोहखनिजाचे उत्खनन वाढवून १० दशलक्ष टन इतके करण्यात येणार आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील १३ गावे प्रभावित होणार आहे. त्याकरिता २७ ऑक्टोबरला या गावातील व परिसरातील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी गडचिरोली येथे जनसुनावणी ठेवण्यात आली आहे. मात्र, गडचिरोली येथे या परिसरातील आदिवासी नागरिकांना पोहोचणे शक्य नसल्याने ही सुनावणी रद्द करून नव्याने एटापल्ली येथे घेण्यात यावी, असे आत्राम यांचे म्हणणे आहे. लोह उत्खननामुळे मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या जड वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. धुळीमुळे नागरिक त्रस्त आहे. खराब रस्त्यांमुळे प्रवास करणे कठीण होऊन बसले आहे. अशा परिस्थितीत या प्रकल्पाविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे जनसुनावणी योग्य पद्धतीने घेऊन प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे. त्याकरिता ही सुनावणी एटापल्ली येथे घेण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी उपामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आज गडचिरोलीत सुनावणी

लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा विरोध झुगारून आज गडचिरोली येथे जनसुनावणी ठेवण्यात आली आहे. यासाठी कंपनीने शेकडो वाहनातून नागरिकांना एक दिवस आधीच गडचिरोली येथे आणले आहे. त्यामुळे या सुनावणीप्रक्रियेवर शंका उपस्थित केल्या जात आहे. केवळ निवडक लोकांना यासाठी तयार करून आणले असल्याचा आरोप येथील काही युवकांनी केला आहे.

Story img Loader