संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी सहकारमंत्री ज्येष्ठ नेते शंकरराव गेनुजी कोल्हे (वय 93) यांचे आज पहाटे नाशिक येथे सुश्रुत रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. एक मातब्बर सहकार तज्ज्ञ, पाणी प्रश्नावर शेवटपर्यंत लढा देणारे व सर्व विषयांचा गाढा अभ्यास असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता सहजानंदनगर तालुका कोपरगाव संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचं पार्थिव देह येसगाव येथील त्यांच्या वस्तीवर व त्यानंतर दुपारी संजीवनी कारखाना स्थळावर दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
माजी मंत्री शंकरारराव कोल्हे यांनी १९६० मध्ये सहकाराच्या माध्यमातून संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी रासायनिक प्रकल्प यशस्वी करत राज्याला अनेक पायलट प्रकल्प दिले. १९७२ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभेची उमेदवारी केली आणि कोपरगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने येथून सुरू झालं. १९८५ ते १९९० चा अपवाद सोडता ते सहा दशके आमदार होते.