सोलापूर : दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप ब्रह्मदेव माने पाच वर्षांनंतर शिवसेना ठाकरे गटातून काँग्रेस पक्षात स्वगृही परतले आहेत. मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवनात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत माने यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्ष प्रवेश देऊन त्यांचे स्वागत केले.आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर दिलीप माने हे आपल्या सहका-यांसह स्वगृही परतल्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांची ताकद वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या पक्ष प्रवेशाप्रसंगी पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, प्रभारी जिल्हाध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार, कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी महापौर संजय हेमगड्डी, पक्षाच्या प्रदेश भटक्या विमुक्त जाती-जमाती सेवाच्या अध्यक्षा ॲड. पल्लवी रेणके, माजी नगरसेवक विनोद भोसले, पृथ्वीराज माने, सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत खुपसंगे, ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>>लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेडीरेकनर दर ‘जैसे थे’
दिवंगत नेते, माजी आमदार ब्रह्मदेव माने यांचे पुत्र असलेले दिलीप माने हे २००९ साली दक्षिण सोलापूरमधून विधानसभेवर निवडून गेले होते. तत्पूर्वी, त्यांनी २००४ सालच्या विधाधसभा निवडणुकीत तत्कालीन सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघात अपक्ष म्हणून लढत दिली होती. त्यानंतर २०१४ साली ते काँग्रेसच्या चिन्हावर दक्षिण सोलापूर विधानसभा जागेवर उभे राहिले असता भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मागील २०१९ साली बदलते राजकीय वारे पाहून ते शिवसेनेत गेले आणि सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना आव्हान दिले होते. गेल्या पाच वर्षात ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. मात्र अलिकडे दक्षिण सोलापूर विधानसभेची जागा पुन्हा लढविण्याच्या अनुषंगाने ते सक्रिय झाले आहेत. दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यात त्यांना मानणारा वर्ग आहे. सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीसह ब्रह्मदेवदादा सहकारी बँक, दोन खासगी साखर कारखाने, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय आदी संस्थांच्या माध्यमातून त्यांची ताकद आहे.