राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलेलं असताना, राज्यापाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखीच चिघळलं. विरोधकांनी भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य करणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संताप व्यक्त करत औरंगाबाद बंदचे आवाहन करत, भाजपावर जोरदार टीका केली आहे. याचबरोबर त्यांनी औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना(ठाकरे गट) नेते चंद्रकांत खैरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
“चंद्रकांत खैरे म्हणतात ना हर्षवर्धन जाधवमुळे मुस्लीम उमेदवार निवडून आला. आता कुठे आहेत चंद्रकांत खैरे बाहेर पडा आणि दुकाने बंद करत बाजारात फिरा. ज्या हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही २५ वर्षे निवडून आलात, त्या हिंदूंच्या राजाचा अवमान करणं सुरू आहे तुम्ही आहात कुठे?” असा सवाल हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंना केला आहे.
याशिवाय, “मी औरंगाबादच्या सर्वांना आवाहन करतो की तुम्ही उद्या दुकाने बंद ठेवा. मुस्लीम लोक उद्या दुकाने बंद ठेवणार आहेत. आपण जर दुकाने बंद ठेवली नाहीत तर आपल्या घरात जे छत्रपतींचे आपण फोटो लावतो ते लावण्याचीही लायकी राहणार नाही. आज दुकाने बंद ठेवून दाखवा यांना की महाराजांबद्दल बोललेलं चालणार नाही. वाकड्यात घुसलात तर थोबाडीत देऊ.” असंही हर्षवर्धन जाधवांनी आवाहन केलं आहे.