राजकारणात कोण कोणाचा शत्रू आणि मित्र नसतो असे म्हणतात. मात्र रायगडकरांना सध्या त्याचाच अनुभव येतो आहे. आपापसांतील मतभेदांमुळे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे जलसंपदामंत्री सुनील तटकरे आणि माजी आमदार माणिक जगताप पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. महाडमधील बिरवडी येथे जाहीर कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर येऊन त्यांनी आपापसातील मतभेदांना तिलांजली दिल्याचे दाखवून दिले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर माजी आमदार माणिक जगताप यांनी आपल्या पराभवाचे खापर जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यावर फोडले होते. ते एवढय़ावरच थांबले नाही तर राष्ट्रवादीची साथ सोडत त्यांनी काँग्रेसचा हात धरला. गेल्या पाच वर्षांत त्यांनी जिथे जिथे संधी मिळाली तिथे तटकरे आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर टीकेची झोड उठवली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार नाही यासाठी त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली होती. याची मोठी किंमत दोन्ही पक्षांना चुकवावी लागली.  तर तटकरे यांनीही माणिक जगतापांचे खच्चीकरण करण्याची कुठलीही संधी सोडली नव्हती. गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माणिक जगताप विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत कोकण विभागातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र तटकरे यांनी इथेही जगताप यांचा पत्ता कापत आपले थोरले बंधू अनिल तटकरे यांना उमेदवारी मिळवून दिली. यामुळे संतापलेल्या जगताप यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र या प्रयत्नात त्यांना फारसे यश आले नाही. शेवटी ज्या जगतापांनी रायगडात राष्ट्रवादीची मुहूर्तमेढ रोवली त्यांची पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत हकालपट्टी करण्यात आली. यानंतरही जगताप यांच्या विश्वासातील अनेक कार्यकर्ते फोडत शह-काटशहाचे राजकारण सुरूच ठेवले होते. दोघांचे पक्ष वेगळे झाले असले तरी दुरावा मात्र कायम होता.
आता मात्र दोघांमधील मतभेद अचानक संपुष्टात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून दोघेही हातात हात धरून वावरताना दिसत आहेत. दोघांच्या मनोमीलनामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र दोघांमधील मनोमीलनामागेही काही राजकीय समीकरणे आहेत. आघाडीतील जागावाटपानुसार महाड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आहे. आता हा मतदारसंघ काँग्रेसला पर्यायाने माणिक जगतापांना हवा आहे, तर दुसरीकडे रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
 काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीला दिली तर सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे दोघांनाही आता जुळवून घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे आपापसातील मतभेद विसरून दोन्ही नेते एकत्र आले असल्याची चर्चा रंगते आहे.

Story img Loader