दापोली : शिवसेना ठाकरे गटात मी प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेला आम्ही जीव तोडून काम केले.  विधानसभेला मात्र आम्हाला वाऱ्यावर सोडले. त्या परिस्थितीतही आम्ही विरोधकांच्या विरोधात उभे राहिलो. आमची बाजू न समजून घेताच, माझ्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिमगोत्सवानंतर पक्षांतराचा धमका करणार असल्याचे दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी सांगितले.

शिवसेना  ठाकरे पक्षाकडून हकालपट्टी झाल्यानंतर माजी आ. संजय कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, माजी खासदार विनायक राऊत हे सध्या डायरीच घेऊन फिरत असून, त्यात बहुदा नावांची यादी तयार केलेली असावी. कुणाबद्दल चर्चा सुरु झाली की, त्याची हकालपट्टी करा, असे धोरण दिसत असल्याचेही माजी आम. कदम यांनी सांगितले. हकालपट्टी करण्यापूर्वी त्यांनी किमान विचारणा करायला हवी होती. परंतु तसे घडले नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला तरी, खेड, दापोली मतदारसंघामधून आम्ही जीवतोड मेहनत करीत आघाडी मिळवून दिली होती.

परंतु माजी खासदारांनीही विधानसभेला फारशी मदत केली नाही. आमच्याकडेच नाही तर महाडमध्येही तीच परिस्थिती राहिली. तेथील उमेदवार स्नेहल जगताप यांनी बोलवूनही मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे संजय कदम यांनी सांगितले. आमचा झालेला पराभव आम्ही मान्य केला. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली, त्यामुळे आम्ही ऐंशी हजार पार गेलो. परंतु पक्षाकडून जी मदत पाहिजे होती, ती झाली नसल्याची खंत माजी आमदार संजय कदम यांनी व्यक्त केली.

आता दुसऱ्या पक्षात जाण्यास मार्ग मोकळा

हकालपट्टी केल्यामुळे आता दुसऱ्या पक्षात जाण्यास मोकळे आहोत, शिवसेना, भाजपा की मनसे याबाबत लवकरच निर्णय होईल, शिमगोत्सवानंतर कार्यकत्यांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

Story img Loader