संतोष मासोळे, लोकसत्ता
धुळे : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर शिवसेनेतून शिंदे गटाकडे जाणाऱ्यांची रीघ लागली. अशा वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी आमदारांना केलेल्या भावनिक आवाहनानंतर धुळय़ाचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी त्वरित प्रतिसाद देत काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सोडत ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात एक-दोन पदाधिकारी शिंदे गटात गेले असले तरी त्यामुळे शहरातील शिवसेनेच्या ताकदीवर फारसा परिणाम झालेला नाही हे लक्षात घेऊनच आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील समीकरणांचे आडाखे मांडत शरद पाटील पुन्हा शिवसेनेत दाखल झाले आहेत.
शिवसेनेचे उमेदवार म्हणून २००४ मध्ये शरद पाटील यांनी त्यावेळचे मुख्यमंत्रिपदाचे इच्छुक काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा पराभव करत खळबळ उडवली होती. शरद पाटील यांनी काँग्रेसमधून समाजकारण आणि राजकारणाला सुरुवात केली. विद्यार्थिदशेतच त्यांनी धुळय़ाच्या सामाजिक पटलावर भरीव काम केले. नंतर अभ्यासूवृत्ती आणि प्राध्यापक असल्यामुळे सुसंस्कृत प्रतिमा या जोरावर त्यांनी आपली ओळख निर्माण केली. कालांतराने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसची विचारसरणी असलेल्या भागात त्यांच्या प्रयत्नांमुळे शिवसेनेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतही चांगले यश मिळाले. जिल्हा परिषदेत ऐतिहासिक सत्तांतर झाले आणि अध्यक्षपद शिवसेनेकडे आले होते. धुळे पंचायत समितीच्या सभापतीपदावरही शिवसेनेची मोहोर उमटल्यावर शिवसेनेत उत्साह संचारला होता. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शरद पाटील यांच्या रूपाने शिवसेनेला एक आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही यश मिळवून देणारा नेता सापडला.
साहजिकच जिल्ह्यात सेनेची ताकद वाढली होती. शिवसेनेत पक्षांतर्गत कुरबुरी आणि हेव्यादाव्यांना सुरुवात झाल्यावर त्याचा फटका शरद पाटील यांनाही बसला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत रोहिदास पाटील यांचे पुत्र काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी ग्रामीण भागात शिवसेना वाढीसाठी विविध कार्यक्रम घेतले. माळी यांना ग्रामीणऐवजी शहर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेने उमेदवारी दिल्याने शरद पाटील नाराज झाले. त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहण्यास सुरुवात केली.काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी मैत्रीचे संबंध असल्याने शरद पाटील यांनी काँग्रेसमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस प्रवेश झाल्यावर त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. शिवसेनेच्या पडझडीच्या काळात पुन्हा प्रवेश करत पक्षप्रमुख तसेच सामान्य शिवसैनिकांचा विश्वास मिळविला आहे. सुखात असताना सर्वच जण साथ देतात, परंतु, दु:खावेळी साथ देणे अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना साथ दिली, ही प्रा. पाटील यांची प्रतिक्रिया यादृष्टीने बोलकी आहे.