लोकसत्ता वार्ताहर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जालना : परतूरचे माजी आमदार सुरेश जेथलिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) वाटेवर आहेत. परतूर आणि मंठा तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी बळ मिळण्याच्याअनुषंगाने जेथलिया यांची ही वाटचाल महत्त्वाची ठरणार आहे.
जेथलिया यापूर्वी शिवसेनेच्या वतीने विधान परिषद सदस्य राहिले आहेत. त्याचप्रमाणे परतूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते काँग्रेस पक्षात सक्रीय होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘महाविकास’ आघाडीत काँग्रेस पक्षाकडून ते इच्छुक होते. त्यांची उमेदवारीही निश्चित मानली जात होते. परंतु महाविकास आघाडीतील घटक पक्षातील जागा ऐनवेळी ही जागा शिवसेनेकडे (उद्धव ठाकरे) गेली. त्यामुळे जेथलिया यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढविली. परंतु त्यांचा पराभव झाला.
त्यानंतर जेथलिया शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात होती. परंतु गेल्या २५ जानेवारी रोजी जालना येथे झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेत इतरांचा शिवसेनेत शिवसेनेत प्रवेश झाला तरी जेथलिया यांचा मात्र प्रवेश झाला नाही. त्यामुळे त्यांच्या शिवसेनेतील (शिंदे) प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे जेथलिया आता राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश करणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. विश्वसनीय माहितीनुसार जेथलिया आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी येत्या आठ-दहा दिवसांत अजित पवार परतूर येथे येण्याची शक्यता आहे. त्यावेळी जेथलिया शक्तिप्रदर्शन करून अजित पवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या ऐक माजी आमदार अरविंद चव्हाण राष्ट्रवादीत (अ. प.) असून, त या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत. आता जेथलिया यांच्यामुळे आणखी एक माजी आमदार या पक्षात येत आहेत.
जेथलिया हे स्थानिक नगर परिषदेच्या राजकारणात पुढे आलेले राजकीय नेतृत्व आहे. परतूर नगर परिषद जवळपास तीन दशके त्यांच्या अधिपत्याखाली राहिलेली आहे. ते स्वत: परतूरचे नगराध्यक्ष राहिलेले असून, त्यांच्या पत्नी विमल जेथलिया याही नगराध्यक्षपदी राहिलेल्या आहेत.
अनेक नेते इच्छुक
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत येण्यासाठी जालना जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे नेते इच्छुक आहेत. सुरेश जेथलिया हे जुने नेते आणि माजी आमदार आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत काही जणांनी माझ्याकडे विचारणाही केलेली आहे. परंतु प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोपर्यंत याबाबत आपल्याकडे निश्चित माहिती येत नाही, तोपर्यंत आपणास यासंदर्भात अधिकृतरीत्या काही सांगता येणार नाही. -अरविंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार).