सावंतवाडी: लोकप्रतिनिधी कालावधीतील मालमत्ता, उत्त्पन्न व खर्च याबाबतची माहिती असलेल्या परिपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांची पत्नी सौ स्नेहा नाईक यांना ११ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथे उपस्थित राहण्याबाबत पत्र पाठविले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पत्रात म्हटले आहे की, प्रतिबंधक कार्यालयाकडून सुरू असलेल्या उघड चौकशीच्या अनुषंगाने ५ डिसेंबर २०२२ रोजी ला.प्र.वि. कार्यालय रत्नागिरी येथे आपली पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक यांचेसह उपस्थित राहिला. परंतू लोकप्रतिनिधी कालावधीतील आपली मालमत्ता, उत्त्पन्न व खर्च याबाबत परिपूर्ण माहिती त्यावेळी उपलब्ध नसल्याने सदर माहिती आपण मागाहून सादर करणार असलेबाबत समक्ष सांगितल्याने तसा त्यावेळी प्राथमिक स्वरुपात आपला जबाब नोंदविण्यात आला.त्यानंतर चौकशीच्या अनुषंगाने मत्ता व दायित्वाचे १ ते ६ फॉर्ममधील माहिती व आवश्यक कागदपत्रांसह अनुक्रमे दि.३ जानेवारी २०२३ रोजी आणि दि. २८ जून २०२३ रोजी उपस्थित रहाणेबाबत कळविण्यात आले होते. मात्र आपण उपस्थित न राहता दि. २८ जून २०२३ रोजी आपले अकाऊंटंट अमोल केरकर हे उपस्थित राहिले. परंतू त्यांनी आणलेली कागदपत्रे परिपूर्ण नसल्याने ती न देता, काही कालावधी नंतर आपले उपस्थितीत सदरची कादगपत्रे हजर करु असे पत्र त्यांनी लाचलुचपत कार्यालयास दिलेले आहे. परंतु त्यानंतर अद्यापपावेतो कागदपत्रांबाबत पूर्तता झालेली नाही अगर आपण उपस्थित राहिले नाहीत, असे या पत्रात म्हटले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून श्री नाईक यांच्या मालमत्तेच्या सुरु असलेल्या उघड चौकशीचे अनुषंगाने श्री नाईक, त्यांची पत्नी सौ. स्नेहा यांचे तसेच HUF व नाईक स्टोन इंडस्ट्रीज यांचे दि. १ जानेवारी २००२ ते २९ सप्टेंबर२०२२ या कालावधीतील उत्पन्न, खर्च व मालमत्ता याबाबतची आवश्यक ती परिपूर्ण माहिती आपणास या कार्यालयाकडून देण्यात आलेला मत्ता व दायित्वाचे १ ते ६ फॉर्ममध्ये भरुन तसेच कालावधीतील आयकर विवरणपत्रे, ऑडीट रिपोर्ट ,कॉम्प्युटेशन ऑफ इनकम, शेडयुल बॅलन्सशीट, प्रॉफीट अॅन्ड लॉस अकाऊंट डिटेल्स शेडयुल व त्यासंबधीत कागदपत्रांसह दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालय येथे उपस्थित रहावे,अशा प्रकारचे पत्र वैभव नाईक व स्नेहा नाईक यांना पाठविण्यात आले असून या उघड चौकशीचा जबाब नोंदविण्यात येणार आहे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, माजी आमदार वैभव नाईक यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, आपण दि. ११ फेब्रुवारी रोजी उपस्थित राहून चौकशीला सामोरे जावू, दबणार नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mla vaibhav naik and his wife sneha naik summoned for questioning by the anti corruption department in ratnagiri amy