सोलापूर : सोलापूर शहरानजीक कारंबा शिवारातील आपल्या स्वमालकीची आणि ताब्यातील सुमारे १८ एकर शेतजमीन सख्ख्या भावाने आणि त्याच्या मुलाने उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून परस्पर हडपली आणि आपली फसवणूक केल्याची फिर्याद काँग्रेसचे नेते, माजी आमदार व माजी महापौर विश्वनाथ बाबुराव चाकोते यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. त्यानुसार त्यांचे थोरले बंधू तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते आणि त्यांचा मुलगा जयशंकर चाकोते यांच्यासह उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हे फसवणुकीचे प्रकरण २००७ सालातील आहे. याबाबत विश्वनाथ चाकोते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माहिती अशी की, सोलापूर-बार्शी रस्त्यावर शहरानजीक कारंबा (ता. उत्तर सोलापूर) गावच्या शिवारात विश्वनाथ चाकोते यांच्या मालकीची आणि प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीतील शेतजमीन आहे. परंतु कोणतीही नोटीस न देता या मिळकतीच्या ७-१२ उताऱ्यावर आपले नाव कमी करून त्यावर थोरले बंधू महादेव चाकोते यांनी त्यांच्या कुटुंबाच्या घटकांमधील तथाकथित वाटपाच्या आदेशान्वये बनावट मिळकत वाटपाची नोंद करून घेतली. मिळकतीच्या मालकी हक्कातून आपले नाव परस्पर वगळण्यात आले. मिळकतीच्या ७-१२ उताऱ्यावर आपले मालकी हक्काचे नाव असून देखील आपणास नोटीस काढण्यात आली नाही आणि हिस्सा वाटपाच्या वेळी पक्षकार म्हणून सामीलही केले नाही, असे विश्वनाथ चाकोते यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
u
मे २००७ मध्ये शेतजमिनीच्या मिळकतीवर विश्वनाथ चाकोते यांचे नाव कमी करून तेथे महादेव चाकोते यांचा मुलगा जयशंकर याचे नाव नोंद झाल्याची माहिती मिळताच विश्वनाथ चाकोते यांनी २०२१ साली या संदर्भात संपूर्ण शासकीय कागदपत्रांची मागणी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात केली असता तेथे या संदर्भात कोणतीही कागदपत्रे आणि संचिका मिळून येत नसल्याचे उत्तर देण्यात आले. यासंदर्भातील संपूर्ण कागदपत्रे जाणीवपूर्वक गहाळ करण्यात आली असून यात उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील अभिलेख विभागाशी संबंधित तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची संगनमत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बनावट कागदपत्रे तयार करून आणि ती खरी असल्याचे भासवून आपली स्वमालकीची शेतजमीन परस्पर हडपण्यात आली आहे. यापूर्वी आपल्या वडिलोपार्जित नवसमता ट्रान्सपोर्ट एजन्सीची हैदराबाद येथील ऑटोनगर येथील मिळकत दिवंगत वडील माजी आमदार बाबुराव चाकोते यांची बनावट सही करून थोरले बंधू महादेव चाकोते यांनी परस्पर हडप करून फसवणूक केल्याची फिर्याद विश्वनाथ चाकोते यांनी हैदराबादच्या हयातनगर पोलीस ठाण्यात दिली असता त्यानुसार गुन्हा दाखल झाल्याचेही त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस फौजदार संजीवनी हट्टे करीत आहेत.