Sambhaji Raje Chhatrapati on Chhaava Trailer: अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यातील काही दृश्यांवर आता आक्षेप घेतला जात आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई एकत्र नृत्य करताना दाखवले आहेत. यावरून सोशल मीडियासह काही संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहेत. या आक्षेपार्ह प्रसंगावर आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका मांडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माध्यमांशी संवाद साधत असताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “छावा या नावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट येत आहे. ही आनंदाची बातमी आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास यातून पुढे येईल. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची टीम मला येऊन भेटली होती. त्यांनी ट्रेलरची क्लिप मला दाखवली. पण मी त्यांना संपूर्ण चित्रपट दाखविण्याची मागणी केली होती. तसेच मी त्यांना काही इतिहासकार जोडून देणार होतो, जेणेकरून चित्रपटात एखादी चूक असेल तर ती दुरूस्त करता येईल. पण त्यांनी इतिहासकारांशी भेटण्यात स्वारस्य दाखवले नाही.”

सिनेमॅटिक लिबर्टीची चर्चा व्हावी

“छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळताना आणि नृत्य करताना दिसत आहेत. लेझीम हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. लेझीम खेळणे चूक नाही. पण त्या गाण्यावर नृत्य करणे, हे कितपत योग्य आहे? सिनेमॅटिक लिबर्टीमध्ये हे घ्यायला हवे का? यावर चर्चा करणे आवश्यक आहे”, असे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. तसेच लेझीम खेळणे चुकीचे नाही, असेही ते म्हणाले.

छत्रपती संभाजीराजे पुढे म्हणाले की, दिग्दर्शक उतेकर यांनी १०० ते २०० कोटी रुपये खर्च करून छत्रपती संभाजी महाराजांवरील हिंदी चित्रपट तयार केला आहे. या माध्यमातून महाराजांचा इतिहास जगभरात जाणार आहे. पण त्यांनी ट्रेलरमध्ये महाराज नृत्य करताना दाखविल्यामुळे ते लोकांना कितपट पटेल, याबाबत शंका वाटते. त्यामुळेच त्यांनी आम्हाला विनंती केल्यास आम्ही राज्यातील महत्त्वाचे इतिहासकार बसून यावर चर्चा केली. तर त्यातून मार्ग निघेल.

चांगले काम करणाऱ्याचे पाय ओढू नयेत

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे पुढे म्हणाले की, छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटासाठी अनेक वर्ष मेहनत घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य कसे स्थापन झाले, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. मी चित्रपटाच्या एका प्रसंगावरून टीका करणार नाही. जर कुणी चांगले काम करत असेल तर त्याचे पाय ओढणे बरोबर नाही. माझी सहकार्य करण्याची भूमिका आहे. त्यांनी लवकरात लवकर इतिहासातील जानकार मंडळींशी भेटून काही दुरुस्ती असतील तर त्या करून घ्याव्यात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mp sambhaji raje on vicky kaushal chhava film trailer controversy says discussion must on cinematic liberty kvg