शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर हल्लाबोल करत ते रोज नवे खुलासे करणार असल्याचे म्हटले आहे. राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना इशारा दिला आहे. आमची कुंडली आहे, अशी धमकी नारायण राणे देत आहेत. धमक्या देणे बंद करा. तुमची कुंडलीही आमच्याकडे आहे. तुम्ही केंद्रीय मंत्री असाल पण हा महाराष्ट्र आहे. ते विसरू नका. आम्ही तुमचे ‘बाप’ आहोत, याचा अर्थ काय ते तुम्हाला चांगलेच माहीत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मात्र आता या आरोप प्रत्यारोपानंतर शिवसेना नेत्यांनीही स्वतःच्याच पक्षाच्या सदस्यांवर टीका केली आहे. हिंगोलीचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने यांनी या प्रकरणावरुन आता टीका केली आहे. नारायण राणे आता खुनी दिसू लागले आहेत मुख्यमंत्री बनवलं होतं तेव्हा ते काय धुतल्या तांदळाचे होते का? असा सवाल माजी खासदार शिवाजी माने यांनी विचारला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शिवाजी माने यांनी ही टीका केली आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी रिंगणाच्या बाहेरून मजा घेत आहे

“ईडीचा घोटाळा जरूर काढा परंतु राज्यसभेत व लोकसभेत ही जनतेचे प्रश्नं मांडा…. ईडीच कायं वाकडं होणारं हे ही आम्हाला माहीत आहे. आज पर्यंत अधिकाऱ्याचं कायं झालं ते आत्ताचं होणारं आहे हे सर्वांनाचं माहीत आहे. ही नवीन समाजकारणाची पद्धती पहावयास मिळते आहे ज्याला आपण सुडाचे राजकारण म्हणू शकतो. बरं आम्ही कुणाशी भांडत आहोत (आपल्याशीचं) नं, काँग्रेस व राष्ट्रवादी रिंगणाच्या बाहेरून मजा घेत आहे. अजित दादां वगळता या विषयावर कुणी भाष्य केलयं हे ऐकविण्यात किंवा वाचण्यात नाही. गोर-गरिबांना घरे देण्याचं सोडून आम्ही आमचीचं पाडापाडी करत आहोत. अशाने काय साध्य होणार आहे,” असे शिवाजी माने यांनी म्हटले आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे कुणी किती कष्टाने कमाई केली – शिवाजी माने

“संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे कुणी किती कष्टाने कमाई केली आहे. ते संजय राऊत कोण होते त्यांचा पगार किती होता ते , किंवा नारायण राणेंचे व्यवसाय कोणते? बरं राणे आता एवढ्या उशिरा खुनी दिसू लागलेतं त्यांना मुख्यमंत्री पदी बसविले होते त्या वेळी ते काय धुतल्यां तांदळा सारखे होते कायं? बरं साहेबांना संरक्षण देण्यासाठी त्यांनीच त्याच्या जिवाची पर्वा केली नव्हती. हे विसरलात का? मुबंईत जी शिवसेना वाढली ज्यात मोजून काही मंडळी होती त्यांत राणे होतेचं ना. ऊगाच शिळ्या कढीला ऊत काय आणत आहात मग का. दत्ता सामांतापासूनच्या हत्येचा शोध घेत बसा कोण कोण गुन्हेगार व गुन्हा करण्यास मदत केली ते सर्व बाहेर येईल. शेवटी तुम्ही आम्ही सर्वच जण फाटक्या शिवसैनिकांच्या जीवावर मोठे झाले आहोत हे विसरून चाललोत हे मात्र नक्की.  फाटक्यांचे राज्य कधी येणार त्याचं स्वप्न कधी पूर्ण होणारं? एक गोष्ट विसरू नका मुंबईला वाचविणारी मंडळीचं आपआपसात भिडत आहेत व ती कशी संपेल याचीचं वाट काँग्रेस पहात आहे,” अशी टीका शिवाजी माने यांनी केली.

याआधी नारायण राणेंशिवाय संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. पालघरमध्ये २६० कोटी रुपयांच्या प्रकल्पावर काम सुरू आहे आणि ते किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या नावावर आहे, असे राऊत यांनी म्हटले. संजय राऊत आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते.

मी उत्तर द्यायला समर्थ – नारायण राणे

राणेंच्या जुहूमधील बंगल्याला मुंबई महानगर पालिकेकडून नोटीस पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी टीका केली होती. “जुहू-वांद्रेच्या इमारती बघा. त्या आधी तपासा. मुंबईत कायदेशीर-बेकायदेशीर काय हे पाहा आणि मग आमच्याकडे या. इथे काही कमी-जास्त असेल तर आम्ही बसलो आहोत ना. त्यासाठी नोटिसा वगैरे लावताय. कोण आहेत हे? चांगल्या आठवणी मिळतायत आणि जबाबदाऱ्या वाढत आहेत. मी उत्तर द्यायला समर्थ आहे,” असे नारायण राणे यांनी म्हटले होते.

लाचारी कशी पत्कारायाची हे नारायण राणेंकडून शिकायचं – विनायक राऊत

यावर उत्तर देताना खासदार विनायक राऊत यांनीही पत्रकार परिषद घेतली होती. “केवळ स्वार्थासाठी सत्तेची लाचारी करत असताना, स्वाभिमान कसा गुंडाळून ठेवायचा आणि लाचारी कशी पत्कारायाची. हे केवळ आणि केवळ कोणाकडून शिकायचं असेल तर ते नारायण राणे यांच्याकडून. म्हणून मला एकतर सर्वजण प्रश्न करत आहेत. की एका केंद्रीय मंत्र्याने, ईडीच्या नावाचा दुरुपयोग करून एखाद्याला धमकी देणं, हा निश्चितच केंद्रीय पदाचा केलाला दुरुपयोग आहे,” असे विनायक राऊत म्हणाले होते.