Sujay Vikhe Patil On Shirdi Sai Sansthan : शिर्डीतील साई संस्थानच्या प्रसादालयामध्ये मोफत भोजन दिलं जातं. मात्र, आता साई संस्थानच्या प्रसादालयात देण्यात येणारे मोफत जेवण बंद करा आणि जेवणासाठी पैसे घ्या, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे. तसेच मोफत जेवणासाठी जे पैसे दिले जातात ते पैसे मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केले जावेत, अशी मागणीही सुजय विखे यांनी केली आहे. तसेच ‘संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करतोय, संपूर्ण महाराष्टातील भिकारी येथे गोळा झालेत’, असं विधानही सुजय विखे यांनी शिर्डीतील एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे. त्यांच्या या विधानावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.
सुजय विखे काय म्हणाले?
शिर्डी परिक्रमाच्या कार्यक्रमात बोलताना माजी खासदार सुजय विखे म्हणाले की, “साई भक्त आणण्याच्या पार्श्वभूमीवर परिक्रमा हे एक माध्यम आहे. त्यामध्ये दोन्ही गोष्टी साध्य होतात. साई बाबांच्या विचारांची प्रसिद्धी देशभरात होते. त्याबरोबरच शिर्डीच्या अर्थकारणाला चालना मिळावी असा एक संयुक्तिक मेळ घातला जात आहे. मात्र, आपल्याला भविष्यात दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत. संस्थानचा खर्च हा अशा माध्यमातून व्हावा की त्या खर्चाची परतफेड या भूमित जन्मलेल्या माणसांच्या उपजिविकेचं साधन झालं पाहिजे. आता एक हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय घेतला, हॉस्पिटलही बांधू शकतात. मात्र, आज शिर्डीकरांची ती गरज नाही”, असं सुजय विखे यांनी म्हटलं.
हेही वाचा : “…आता हेडलाईन करु नका नाहीतर मला जोडे बसतील”, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
“आज शिर्डीकरांची गरज आहे की जसं आपण २९८ कोटींचं शैक्षणिक संकुल बांधलं. तसेच ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग सेंटर सुरु केलं पाहिजे. आपण हॉस्पिटल उभारलं पण त्यात फक्त २५ टक्के स्थानिक लाभ घेतात आणि ७५ टक्के बाहेरचे लोक लाभ घेतात. मात्र, त्यामुळे ना स्थानिकांचं जीवनमान बदलंत, ना स्थानिकांना रोजगार मिळतो. संस्थानचा उद्धेश हा भक्तांची काळजी घेणं आणि शिर्डीची अर्थव्यवस्था बळकट करणं आणि येथील मुलांचं भविष्य घडवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे”, असं सुजय विखे म्हणाले.
‘महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झालेत’
“साई मंदिरातील प्रसादालयात आपण मोफत जेवण देतो. मात्र, जेवणासाठी २५ रुपये घेतले पाहिजेत. जेवणासाठी पैसे घेतले पाहिजेत. तो पैसा वाचेल तो पैसा मुला-मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे. संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करतोय. संपूर्ण महाराष्ट्रातील भिकारी या ठिकाणी गोळा झालेत. हे योग्य नाही. संस्थानने आपण काय करत आहोत? याचा विचार केला पाहिजे”, असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे.
‘इंग्लिश शिकवणाऱ्याला इंग्लिश येत नाही’
“संस्थानने २९८ कोटींचं शैक्षणिक संकुल बांधलं. पण आपण दर्जेदार शिक्षण देऊ शकत नाहीत. शिक्षकांच्या पगाराला पैसे जाऊद्या. पण त्यामध्ये शिकणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्याला तरी किमान चांगलं इंग्लिश बोलता आलं पाहिजे. शैक्षणिक संकुलाच्या इमारतीवर खर्च केला जातोय. सभाग्रहावर खर्च केला जातोय, पण गुणवत्तेवर खर्च केला जात नाही. गुणवत्तेवर पैसा खर्च केला पाहिजे, तर विद्यार्थी घडतील. आता इंग्लिश विषय शिकवणाऱ्यालाच इंग्लिश येत नाही. काय उपयोग? इंग्लिशवाला मराठीत इंग्लिश शिकवतोय. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण साई मंदिराच्या प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा. मग यासाठी आंदोलनाची वेळ आली तरी आपण आंदोलन करू”, असा इशारा देखील सुजय विखे यांनी दिला.