रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील नाणार बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार म्हणून परप्रांतीय लोकांनी येथील जमिनी विकत घेतल्या. त्या जमिनीसाठी माजी आमदार राजन साळवी यांनी पावणे तीन कोटी रुपयांची दलाली केली. या परप्रांतीय लोकांकडुन पैसे घेऊन साळवी यांनी राजापूर वासियां बरोबर गद्दारी केली. असा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला. ते राजापूर येथील कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात बोलत होते.
ते म्हणाले की, २००४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये आमदार उदय सामंत यांना निवडून आणण्यासाठी गद्दारी केली. हे विद्यमान आमदार किरण सामंत यांनीच सांगून साळवी यांचा बुरखा फाडला आहे. अशा राजन साळवींनी गद्दारीचा कळस गाठला आहे. असे ही राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले, राजापूर भागात रिफायनरी सारखा प्रदुषणकारी प्रकल्प नको असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींनी ठराव देखील केले होते. स्थानिक लोकांचा विरोध असताना देखील राजन साळवी यांना हा प्रकल्प आणायचा होता. कारण त्यांनी परप्रांतीय भू माफियांकडून पावणे तीन कोटी रुपये घेतले. राजापुर वासियांबरोबर गद्दारी करुन त्यांना हा प्रकल्प आणायचा होता. असे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. राजापुर मधून गद्दारी करणारे राजन साळवी हे शेवटचे असतील, यापुढे राजापुरचा आमदार हा निष्ठावंत कार्यकर्ता असेल. असे ही त्यांनी सांगितले. यावेळी विनायक राऊत यांनी रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली.
राऊत म्हणाले, खेडचा रामागडी म्हणजेच रामदास कदम शिवसेना संपवायला निघला आहे. मात्र त्यांच्या सात पिढ्या जरी आल्या तरी शिवसेना संपवू शकत नाही असे राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले, आता गद्दारांना कंठ फुट लागला आहे. मात्र केसा पासून पायापर्यत फक्त सव्वा तीन फुट उंची असलेले रामदास कदम शिवसेना काय संपवणार? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. कोकणात रामदास कदम यांच्या सारखी औलाद जन्माला आली हे दुर्देव आहे. मात्र आता दाढीवाल्यांचे काउन डाउन सुरु झाले आहे.
भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी आता त्यांचे भ्रष्टाचाराचे प्रस्ताव रद्द करत चौकशी सुरु केली आहे, असे ही राऊत यांनी सांगितले. त्यांनी यावेळी मस्त्य मंत्री नीतेश राणे यांच्यावर टीका करत नीतेश राणे यांना मंत्री होताना घेतलेल्या शपथेची आठवण करुन देण्यासाठी त्यांना न्यायालयात खेचणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. कणकवली येथील लॉजमध्ये वेशा व्यावसाय करताना सापडलेल्या महिला म्यानमार येथील आहेत. मात्र हा लॉज नीतेश राणे यांच्या जवळच्या कार्यकर्त्याचा आहे. तसेच मालवणात पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणा-या भंगार व्यावसायिकाला व्यावसाय करण्यास परवानगी देणारी ग्रामपंचायत भाजपाचीच आहे असे ही राऊत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राजापुर येथील शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..