मुंबईचे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव (वय ७४) यांचे  सोमवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर आज (मंगळवार) साताऱ्यातील पुसेगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

न्यायप्रिय, प्रामाणिक, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून धनंजय जाधव यांची ओळख होती.  मागील काही दिवसांपासून धनंजय जाधव यांना हृदयाच्या आजाराचा त्रास होता. त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. ते पुण्याचे माजी पोलीस आयुक्तही होते. याचबरोबर धनंजय जाधव हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते. निवृत्तीनंतर त्यांना अनेक पक्षातून आँफर होती, पण त्यांनी राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता.

धनंजय जाधव यांचा जन्म १९४७ मध्ये पुसेगाव (जि.सातारा) येथे झाला. पुसेगावातच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले तर माध्यमिक शिक्षण वाई येथे झाले. त्यानंतर त्यांनी एम एस्सीची पदव्युत्तर पदवी घेतली. प्रथम ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून रूजू झाले. १९७२ ला ते युपीएससीची परीक्षा पास झाले आणि पोलीस अधीक्षक म्हणून धुळे येथे रूजू झाले. त्यानंतर वर्धा, नगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं. पुणे येथे  पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली होती.  काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. धनंजय जाधव यांनतर २००४ ते २००७ या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली. ते या पदावर २००७ ते २००८ या काळात होते आणि निवृत्त झाले.

निवृत्ती नंतर त्यांनी एमपीएससी बोर्डवर दोन वर्षे काम केलं. नंतर त्यांच्या मुळ गावी, पुसेगाव या ठिकाणी त्यांनी एक शिक्षण संस्था सुरु केली. शेती करत ते या संस्थेचे काम पाहात होते. जाधव यांना उत्कृष्ट सेवेबद्दल १९९२ मध्ये राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी स्वातंत्र्यदिनी पोलीस पदक प्रदान करुन त्यांचा गौरव केला होता. त्याच वर्षी राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सन्मान चिन्ह देऊन धनंजय जाधव यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव केला होता.

आज साताऱ्यातील पुसेगाव येथे  धनंजय जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले,काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, खटाव राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, शिवसेना नेते नरेंद्र पाटील, संदीप मांडवे, राजेंद्र कचरे यांच्यासह पंचक्रोशीतील  शेकडो नागरिकांनी जाधव यांना अखेरचा निरोप दिला. तसेच पुसेगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.

Story img Loader