सोलापूर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळात झालेल्या आर्थिक घोटाळ्यात अनेक दिवस तुरूंगात राहिलेले तत्कालीन राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम हे पुन्हा सक्रिय झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात कदम यांची एमआयएम पक्षाच्या पदाधिका-यांनी भेट घेऊन सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. कदम यांनी यासंदर्भात आपली भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा >>> मोदींच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात विदर्भातून, १० ला रामटेक मतदारसंघात सभा
२०१४ साली मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून गेलेले रमेश कदम हे नंतर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना महामंडळात मोठा आर्थिक घोटाळा उजेडात आला होता. या घोटाळ्यात स्वतः कदम हेच सामील असल्याचे पोलीस तपासात आढळून आल्यामुळे त्यांना अटक झाली होती. दरम्यान, मागील २०१९ सालची मोहोळ विधानसभा निवडणूक त्यांनी तुरूंगातच राहून लढविली असता त्यांना २५ हजारापेक्षा जास्त मते मिळाली होती. अनेक दिवस तुरूंगवासात राहिल्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्यांची जामिनावर सुटका झाली होती. सुटकेनंतर त्यांचे मोहोळमध्ये आगमन झाले असता त्यांचे हजारो समर्थकांनी जंगी स्वागत केले होते. त्यामुळे नवे प्रश्नचिन्हही उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर कदम हे पुन्हा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले आहेत. आगामी सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कदम हे चर्चेत आले आहेत. सोलापुरात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपचे आमदार राम सातपुते यांची तुल्यबळ लढत होत असताना वंचित बहुजन आघाडीने राहुल गायकवाड (अक्कलकोट) यांची उमेदवारी आणली आहे. त्यापाठोपाठ एमआयएम पक्षानेही उमेदवार उतरविण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. त्यादृष्टीने या पक्षाच्या पदाधिका-यांनी रमेश कदम यांची सोलापुरात एका हाॕटेलात भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे कदम हे एमआयएमकडून लोकसभा निवडणूक रणांगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र यासंदर्भात कदम यांनी आपली भूमिका लगेचच स्पष्ट केली नाही.