अशोक तुपे, श्रीरामपूर
जनसंघाच्या प्रचारासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पढेगाव ते बेलापूर असा ८ किलोमीटरचा प्रवास चक्क सायकलच्या नळीवर बसून केला. आज त्यांच्या निधनाने बेलापूरकरांना मोठे दु:ख झाले. त्यांच्या सायकल प्रवासाच्या आठवणींना आज भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक उजाळा देत होते. समाजमाध्यमावरही या प्रवासाच्या आठवणीने राजकीय निष्ठा व त्यागाबद्दल ऋण व्यक्त करण्यात आले.
बेलापूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव असलेले गाव. या गावात १९६१ साली अटलबिहारी वाजपेयी जनसंघाचे अध्यक्ष असतांना भेटीसाठी आले. दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर ते पढेगाव या स्थानकावर उतरले. स्वर्गीय पांडुरंग शिंदे या संघाच्या स्वयंसेवकाने त्यांना सायकलवरून बेलापूरला आणले. या सायकलला पाठीमागे कॅरेज नव्हते. तर सायकलच्या पुढील नळीवर बसून वाजपेयी यांनी आठ किलोमीटरचा प्रवास केला. त्यांनी भगवे कपडे परिधान केलेले होते. तर त्यांच्या हातात कमंडलू होता. संघाचे माधवराव डावरे, बद्रीशेठ हरकूट, अण्णाजी जाधव, पांडुरंग शिंदे, वासुदेव कोळसे, मुरलीधर खटोड, राधेशाम व्यास आदी कार्यकर्ते उपस्थित होते. स्वर्गीय राजाभाऊ झरकर हे नगरहून बेलापूर येथे आले होते. पढेगाव ते बेलापूर हा आठ किलोमीटरचा रस्ता दगडमातीचा होता. त्याला मोठमोठे खड्डे पडलेले होते. अशा रस्त्यावरून वाजपेयींना सायकल प्रवास करावा लागला. तोही नळीवर बसून. तेलाचा घाणा चालवणारे पांडुरंग शिंदे यांनी त्यांना सायकलवर आणले. आता ते हयात नाहीत. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी छायाचित्राच्या माध्यमातून त्या आठवणी जपून ठेवल्या आहेत. बेलापूर गावातील अनेक कार्यकर्ते हे वाजपेयींना जुण्या आठवणी पत्राने कळवत. वाजपेयी यांनाही बेलापूरबद्दल विशेष आस्था होती.