भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना पुण्यातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यातल्या भारती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यांना ताप आला आहे. त्याचप्रमाणे त्यांना छातीमध्ये इनफेक्शन झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना पुढील दोन ते तीन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
पुण्यातल्या भारती रुग्णालयात उपचार सुरु
प्रतिभा पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातल्या भारती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज सकाळीच त्यांची प्रकृती जास्त बिघडली. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत आणि त्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहेत अशीही माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत त्यांची प्रकृती सुधारली तर त्यांना घरी सोडण्यात येईल असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
प्रतिभा पाटील देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती
प्रतिभा पाटील यांनी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून काम केलं. २००७ ते २०१२ या कालावधीत त्या देशाच्या राष्ट्रपती होत्या. सध्या त्या ८९ वर्षांच्या आहेत. १९६२ मध्ये जळगाव जिल्ह्यातील जळगाव मतदारसंघातून त्या विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. प्रतिभा पाटील यांना आज सकाळपासूनच बरं वाटत नसल्याने भारती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या उपचारांचा योग्य प्रतिसाद देत आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.