जालना जिल्ह्यातील अंतरवाली गावामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीमार केला आहे. यामध्ये काही महिलांसह अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. याप्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. दुसरीकडे, काही आंदोलकांची प्रकृती खालावली असूनही आंदोलन सुरूच आहे.
संबंधित आंदोलकांवर लाठीमार करण्याचा आदेश सरकारने दिलाच नव्हता, असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. या सर्व घडामोडींनंतर शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहे. आंदोलकांवर झालेला लाठीमार हा पूर्वनियोजित कटाचा भाग असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हे षडयंत्र रचलं, असा गंभीर आरोप हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केला.
हेही वाचा- “मला तिघेही खूप तणावात दिसतात”, शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांबाबत पंकजा मुंडेंचं मोठं विधान
यावेळी सुभाष वानखेडे म्हणाले, “महिलांवर लाठीचार्ज झाला. छोट्या-छोट्या मुलांवर लाठीचार्ज झाला, हे कसं शक्य आहे? म्हणजे हे पूर्णपणे पूर्वनियोजित आहे. याचं षडयंत्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं असून त्यांनीच हे सगळं घडवून आणलं आहे. ते मनुवादी आहेत. ते १०० टक्के मराठा समाजाचे विरोधक आहेत. त्यामुळेच हा सगळा प्रकार घडला आहे.”
हेही वाचा- “शिंदेंना बरोबर घेणं भाजपाची गरज होती, पण अजितदादांबद्दल…”, पंकजा मुंडेंचं थेट विधान
याप्रकरणाचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. घडलेल्या सर्व गोष्टींची फडणवीस यांना पूर्वकल्पना होती. त्यांनीच मराठा समाजाविरुद्ध कट रचला. त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही सुभाष वानखेडे यांनी केली.