शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. ही बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी अलिबाग येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमातून शिंदे गटाला इशारा दिला होता. बंडखोर आमदारांच्या पार्श्वभागावर दांड्याचे फटके मारायला हवेत, असं त्या म्हणाल्या होत्या.
अशी आक्रमक भूमिका घेऊन १५ दिवसही उलटले नाहीत, तोपर्यंत शीतल म्हात्रे यांनी यू-टर्न घेतला आहे. त्या नुकत्याच शिंदे गटात सामील झाल्या आहेत. शिंदे गटात सामील होण्यामागची भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली आहे.
आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी म्हटलं की, “शिवसैनिक हा मनाने विचार करणारा असतो. तो बुद्धीने विचार करत नाही. जेव्हा ही घटना घडली तेव्हा मलाही प्रथम धक्का बसला की, हे असं कसं होऊ शकतं? कालांतराने जेव्हा आम्ही त्यांची भूमिका समजून घेतली. आम्ही त्यांचे विचार ऐकले. तेव्हा आम्हाला वाटलं की अरे आमची पण हीच भूमिका आहे. परंतु आम्हाला इतके दिवस बोलता येत नव्हतं किंवा आम्ही बोलू शकलो नाही. पण आता जी व्यक्ती बोलत आहे, त्यांच्यासोबत जाऊन उभं राहणं, हे एक शिवसैनिक म्हणून मला माझं आद्य कर्तव्य वाटलं. म्हणूनच मी आज येथे आलेली आहे.”
विशेष म्हणजे शीतल म्हात्रेच नव्हे तर याआधी आमदार संतोष बांगर यांनी देखील अशाच पद्धतीने यू-टर्न घेऊन शिंदे गटात सामील झाले आहेत. बंडखोरी झाल्यानंतर बांगर यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने भूमिका घेत, बंडखोर आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे ‘निष्ठेचा नांगर, संतोष बांगर’ अशा पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्या होत्या. पण यानंतर अवघ्या काही दिवसातच बांगर यांनी यू-टर्न घेतला आणि शिंदे गटात सामील झाले.