नगरः संघर्षशील नेते, माजी केंद्रीय मंत्री बबनराव दाजीबा ढाकणे यांचे रात्री रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा प्रताप ढाकणे, सून व नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी दुपारी त्यांच्या मूळ गावी पागोरी पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बबनराव ढाकणे गेले काही दिवसांपासून न्यूमोनियाने आजारी होते. त्यामुळे त्यांना नगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
पंचायत समिती सदस्य ते केंद्रीय मंत्री असा धडाडीचा प्रवास करणारे बबनराव ढाकणे यांनी विद्यार्थी दशेतच थेट दिल्ली गाठून तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांची भेट घेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले होते. गोवा मुक्ती संग्रामातही ते सहभागी झाले होते. चार वेळा आमदार, एकदा खासदार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, विधानसभेचे उपाध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द गाजली. केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची स्थापना, तत्पूर्वी राज्य ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेची स्थापना त्यांनी केली. खासदार म्हणून ते बीडमधून विजयी झाले होते. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
सन १९६७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना त्यांनी पाथर्डीतील विद्युतीकरणाच्या प्रश्नावर विधानसभेच्या गॅलरीतून पत्रके भिरकावून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना मोठी गाजली. त्यांच्याविरुद्ध विधानसभेत हक्कभंगाचा ठरावही करण्यात आला. त्यांना सरकारने माफी मागण्यास सुचवले होते. परंतु जनतेसाठी आपण आंदोलन केले असे सांगत त्यांनी माफी मागण्यास नकार दिला होता त्यामुळे त्यांना सात दिवस कारावासाची शिक्षा देण्यात आली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी स्वतः या प्रश्नावर बैठक बोलून दोन महिन्यात मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याची पूर्तता करीत मुख्यमंत्री नाईक पाथर्डीत आले होते.
बबनराव ढाकणे यांच्या विनंतीनुसार महाराष्ट्रातील दुष्काळा दौरा करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाथर्डी तालुक्यात भेट दिली होती. त्यामुळे १९७२ ते ७५ दरम्यान पाथर्डी तालुक्यात ११० पाझर तलावांची निर्मिती झाली. अवघे नववीपर्यंत शिक्षण झालेल्या बबनराव ढाकणे यांनी अनेक चळवळी आंदोलने केली व त्यासाठी कारावास भोगला. ऊस तोडणी मजुरांच्या प्रश्नावर त्यांचा तत्कालीन भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी संघर्ष झाला होता. काँग्रेस, जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास त्यांनी केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्थेची ही स्थापना केली.