सावंतवाडी: मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उभारण्यात येणाऱ्या पुतळयाची तलवारीसह उंची ही ८३ फूट राहणार आहे. या पुतळ्याच्या चबूतऱ्याचे काम पूर्ण झालेले असून या चबूतऱ्यासाठी स्टेनलेस स्टील प्रकारातील लोखंड महाराष्ट्रात प्रथमच वापरण्यात आले आहे. तसेच पुतळ्याचे स्ट्रक्चरल व इंजिनियरिंग संकल्पन विख्यात संरचना तज्ज्ञ प्रा. जहांगीर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. पुतळा समुद्र किनारी उभारण्यात येत असल्याने स्ट्रक्चरल ऍनालिसीस करताना हा पुतळा २०० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे झेलू शकेल, याचा अभ्यास करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या पुतळ्याच्या कामाची पायाभरणी करण्यात येणार असून तांत्रिक बाबींची पूर्तता करून लवकरच पुतळ्याच्या उभारणीस सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहितीही श्री. किणी यांनी दिली .मालवण येथील राजकोट किल्ल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी पत्रकार परिषद घेऊन पुतळ्याच्या कामाविषयी माहिती दिली. यावेळी सा. बां. उपविभाग मालवणचे अभियंता अजित पाटील उपस्थित होते.
यावेळी महेंद्र किणी म्हणाले, राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा योद्ध्याच्या आवेशात आणि समुद्राच्या दिशेने तलवार रोखून समुद्रातून होणाऱ्या परकीय आक्रमणाना आव्हान देत असलेल्या स्थितीत असणार आहे. या पुतळ्याची उंची ६० फूट असणार असून महाराजांच्या हातातील तलवारीची उंची २३ फूट असणार आहे, त्यामुळे चबूतऱ्याच्या वरच्या भागापासून या पुतळ्याची एकूण उंची ८३ फूट असणार आहे. चबूतऱ्याच्या कामासाठी एम५० ग्रेडचे काँक्रीट वापरण्यात आले आहे, तर एएसडब्ल्यू कंपनीचे स्टेनलेस स्टील प्रकारातील लोखंड वापरण्यात आले आहे. तसेच पुतळ्याच्या कामासाठी स्ट्रक्चरल फ्रेमवर्क फ्लेक्स स्टील मध्ये करून त्याचे संकल्पन आयआयटी मुंबई सारख्या तज्ज्ञ संस्थेकडून मंजूर करून घेतले आहे, असेही ते म्हणाले.
हा पुतळा समुद्र किनारी उभारण्यात येत असल्याने चहुबाजूने होणारा वेगवान वाऱ्याचा आघात पुतळा झेलू शकेल असे तसेच भूकंपातही पुतळा टिकू शकेल असे भूकंप विरोधी बांधकाम संकल्पन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे, असेही महेंद्र किणी यांनी सांगितले. पुतळ्याचे भाग जसजसे मालवणात दाखल होतील त्याप्रमाणे त्यांचे जोडकाम करून टप्प्या टप्प्याने पुतळा उभारण्यात येईल. त्यानंतर जोडणी, वेल्डिंग व पॉलिशिंग यांची तपासणी करून १५ एप्रिल पर्यंत पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे, असेही महेंद्र किणी म्हणाले.