बिबटय़ाचे कातडे विकण्यासाठी आलेल्या चौघाजणांना पोलिसांनी चिपळूण-गुहागर मार्गावर कातडय़ासह रंगेहाथ पकडले. बिबटय़ाचे कातडे विक्री करणारी टोळी पकडण्याची गेल्या महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. या प्रकरणी अटक केलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे- मुनावर शहाबाज खान (वय २६, रा. वेहेळे), अमोल सखाराम पालकर (वय ३९, पिंपळी खुर्द), सुनील कृष्णा जडय़ाळ (कासे) आणि सुधाकर धाकटू नेवरेकर (वय २६, मूर्तवडे). यापैकी नेवरेकर याने सुमारे सहा महिन्यांपूर्वी या बिबटय़ाची मूर्तवडे गावाच्या जंगलमय भागात शिकार केल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. त्यानंतर बिबटय़ाची कातडी काढून विकण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी बनावट गिऱ्हाईकामार्फत संबंधितांशी संपर्क साधला. कातडय़ाची किंमत पाच लाख रुपये ठरवण्यात आली. तसेच हा व्यवहार करण्यासाठी या चौघांना चिपळूण-गुहागर बाह्य़वळण मार्गावर बोलावण्यात आले. त्यानुसार रविवारी रात्री ते आले असता चिपळूणचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून चौघांनाही पकडण्यात आले. त्यांच्याकडील बिबटय़ाचे कातडेही पोलिसांनी जप्त केले आहे. या कारवाईची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन सोमवारी दुपारी या चौघाजणांना पुढील कारवाईसाठी परिक्षेत्र वनाधिकारी आर. जी. कोल्हे व शहाजी पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा