पेट्रोलपंप चालकावर केडगावमध्ये गोळीबार करून पळून जाणा-या मध्य प्रदेशातील चौघा संशयितांना शहरातील कोतवाली पोलिसांनी सुपा पोलिसांच्या मदतीने मध्यरात्री पकडले. त्यांच्याकडून तीन गावठी कट्टे व ७ काडतुसे हस्तगत करण्यात आली. न्यायालयाने त्यांना दि. २५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश आज दिला.
गोळीबारातून पेट्रोलपंपावरील व्यवस्थापक नितीन युवराज भोसले (रा. सारसनगर) थोडक्यात बचावले. पोलिसांनी कृपाससिंह मानदसिंह हुज्जर (२५, काठमगाव, भिंड), बंटी ऊर्फ राघवेंद्र रजपूत (२४, आलमपूर), रवि भगवानदास शर्मा (३२, ग्वाल्हेर) व समीर सलीम बेग (१९, ग्वाल्हेर) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. चौघांकडे मिळालेली शस्त्रे पाहता ते कोणत्या तरी कटात सहभागी असावेत असा संशय व्यक्त करताना पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती दिली.
हे चौघेही स्वीफ्ट कारमधून (एमएच १७ सीबी ३९९०) मध्य प्रदेशमधून औरंगाबादला आले व तेथून नगरमार्गे पुण्याकडे जात होते. वाटेत रात्री बाराच्या सुमारास पुणे रस्त्यावरील केडगावमधील पंजाब ऑटो पेट्रोलपंपावर कारमध्ये डिझेल भरण्यासाठी थांबले, तेथे सुमारे २ हजार ५०० रुपयांचे डिझेल भरून ते पैसे न देताच निघून जात होते. पंपावरील व्यवस्थापक भोसले यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता एकाने त्यांच्यावर गोळीबार केला व चौघांनी कारमधून पुण्याच्या दिशेने पलायन केले.
भोसले यांनी ही माहिती तातडीने कोतवाली पोलिसांना सुपे पोलिसांना दिली. सुपे पोलिसांनी नाकाबंदी करून स्वीफ्ट कार थांबवली व चौघांना पकडले. नंतर कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले.
आणखी दोघांकडून कट्टा जप्त
एमआयडीसी पोलिसांनी आणखी एका अन्य घटनेत पुण्यातील दोघांना अटक करून त्यांच्याकडून गावठी कट्टा व २ काडतुसे जप्त केली. अजित रामचंद्र गायकवाड (२५) व दुर्गादास पांडुरंग शेडगे (२२) अशी दोघांची नावे आहेत, दोघांना न्यायालयाने दि. २६ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना दोघेजण जेऊरच्या टोल नाक्यवर बसले असून त्यांच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली होती. दोघे जण मोटारसायकलवरून घोडेगाव येथून पुण्याकडे जाताना टोलनाक्यावर थांबले होते. घोडेगाव येथील अनेक तरुणांना गावठी कट्टय़ाच्या खरेदीविक्री व्यवहारात यापूर्वी अटक करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशातील चौघांना अटक, तीन कट्टे हस्तगत
पेट्रोलपंप चालकावर केडगावमध्ये गोळीबार करून पळून जाणा-या मध्य प्रदेशातील चौघा संशयितांना शहरातील कोतवाली पोलिसांनी सुपा पोलिसांच्या मदतीने मध्यरात्री पकडले.
आणखी वाचा
First published on: 21-07-2014 at 03:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four arrested of madhya pradesh fire on petrol pump operator