सोलापूर : बार्शी शहरात देहविक्रय व्यवसायासाठी बांगलादेशातून आणलेल्या चार महिलांसह सहा नागरिकांना, तसेच त्यांना आधार देणारे अन्य तिघे अशा नऊ जणांना पोलिसांनी पकडले आहे.
या संदर्भात बार्शी शहर पोलीस ठाण्यातील फौजदार सोनम जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बांगलादेशातील कालिया, तिरूखदा, तुलना, नोडाईल या भागात राहणाऱ्या चार महिलांसह साकिब बादशाह बुईया आणि शोएब सलमा शेख, तसेच या सर्वांना वार्षिक आसरा देऊन महिलांकडून देहविक्रय करून घेणारे विशाल मांगडे (रा. मांगडे चाळ, बार्शी) आणि किरण परांजपे (रा. तेल गिरणी चौक, बार्शी) आणि राणी नावाची महिला अशी नऊ आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय पारपत्र अधिनियम १९५०, परकीय नागरिक आदेश अधिनियम १९४८, विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६, भारतीय न्यायसंहिता आदी कायद्यांतील तरतुदींनुसार बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोलापूरच्या दहशतवादविरोधी पथकाने बार्शी शहर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
बार्शी शहरातील पंकजनगरात एका दुमजली इमारतीमध्ये चार महिला आणि दोन पुरुष अशा सहा बांगलादेशी घुसखोरांचे वास्तव्य होते. ते कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय, तसेच अवैध मार्गाने घुसखोरी करून भारतात प्रवेश केला आणि बार्शी शहरात वास्तव्य करताना आढळून आले. त्यांच्याकडे बनावट भारतीय आधार कार्डसह एक लाख ४१ हजार ६०० रुपये रोख आणि ४६ हजार रुपये किमतीचे स्मार्ट फोन सापडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांना बार्शीत वास्तव्य करण्यासाठी राणी नावाच्या महिलेसह विशाल मांगडे आणि किरण परांजपे या तिघांनी मदत केल्याची माहिती समोर आली. एवढेच नव्हे, तर यातील महिलांकडून अवैधरीत्या देहविक्रय करून घेतला जात असल्याची माहितीही चौकशीत निष्पन्न झाली. हे सर्वजण बार्शीत कसे आले, केव्हापासून त्यांचे वास्तव्य होते, त्यांचे सूत्रधार कोण, याचा तपास फौजदार उमाकांत कुंजीर करीत आहेत. शेतमालाची मोठी बाजारपेठ असलेल्या बार्शी शहरात देहविक्रय व्यवसाय वर्षानुवर्षे चालत असल्याचे बोलले जाते.
काही दिवसांपूर्वी मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी भागातही तीन बांगलादेशी नागरिकांना अवैध वास्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता बार्शीतही सहा बांगलादेशी घुसखोर नागरिकांना ताब्यात घेण्यात आल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.