लोकसत्ता प्रतिनिधी
सातारा : साताऱ्यात रविवार हा अपघात वार ठरला आहे. वेगवेगळ्या अपघातांत चार ठार आणि पाच जण जखमी झाले आहेत. बंगळूर महामार्गावर पाचवड (ता. वाई) येथे मोटार बंद ट्रकवर आदळून दोन महिलांचा मृत्यू झाला. शेंद्रे (ता. सातारा) गावाच्या हद्दीत दुचाकीला ट्रकने ठोकल्याने एकाचा मृत्यू झाला, तर सातारा बसस्थानक समोर दुचाकीचालक ट्रकखाली सापडून ठार झाला.
पुणे – बंगळूर महामार्गावर सातारा – पुणे मार्गिकेवर नादुरुस्त मालट्रकला मागून मोटार धडकल्याने मोटारीतील दोन महिला ठार झाल्या. तर चौघेजण जखमी झाले आहेत. नयना जमीर शेख (शनिवार पेठ सातारा), सलमा उरफान मोमीन (सांगली) अशी अपघातात मृत झालेल्या महिलांची नावे आहेत. तर कैफ इरफान मोमीन, बशिर निसार शेख, इरफान इकबाल मोमीन (सर्व रा. शनिवार पेठ, सातारा), चालक सलमान मोहम्मद पठाण (मेढा ता. जावळी) अशी जखमींची नावे आहेत, अशी माहिती भुईजचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी दिली.
महामार्गावर शेंद्रे (ता. सातारा) गावाच्या हद्दीत एका ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिल्याने एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. दिगंबर मनोज शिंदे ( तामकणे, ता. पाटण), असे मृताचे नाव आहे. योगिता (दुर्गा) काशिनाथ जाधव (अरुणोदय हाऊसिंग सोसायटी, शिवराज पेट्रोल पंपमागे, कोडोली, सातारा. मूळ रा. निवकणे, ता. पाटण) असे जखमीचे नाव आहे. ट्रकचालक धनाजी वसंत भोसले (केळवडे ता. भोर) याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा मध्यवर्ती बस स्टँडसमोर वाहतुकीच्या मोठ्या गर्दीच्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात ट्रकखाली आलेल्या दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृताचे नाव उशिरापर्यंत समजू शकले नव्हते. या अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.