नांदेड: गेल्या दोन महिन्यांपासून भाजपाचे संघटनपर्व आणि पक्षाच्या विस्ताराचा नांदेडसह राज्यभर गाजावाजा होत असताना, नांदेडच्या राजकीय भूमीमध्ये मात्र महायुती सरकारमधील अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाणे खणखणत असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे चार माजी आमदार या पक्षाच्या गळाला लागले असून या पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपा खासदार अशोक चव्हाण यांच्यावर कुरघोडी केल्याचे मानले जात आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिन्यात आपापल्या पक्षांच्या कार्यक्रमानिमित्त नांदेडला भेट दिली. नांदेड जिल्ह्यात भाजपाचे नेतृत्व हळूहळू खा.चव्हाण यांच्याकडे सरकत आहे तर राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर आ.चिखलीकर यांच्या माध्यमातून सुरू आहे. नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर चव्हाण व चिखलीकर यांच्यात काँग्रेस किंवा अन्य पक्षांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात दाखल करून घेण्याची स्पर्धाच लागल्याचे दृश्य काही कार्यक्रमांतून समोर आले.
भाजपा प्रदेशाध्यक्षांनी गेल्या महिन्यात नांदेडला भेट दिली तेव्हा पक्षाच्या सदस्य नोंदणीच्या मोहिमेत नायगाव वगळता इतर सर्व विधानसभा मतदारसंघ पिछाडीवर असल्याचे पक्षाच्याच अहवालातून समोर आले होते. या काळात खा.चव्हाण यांनी बावनकुळे यांच्या उपस्थितीत आणि नंतर कंधारच्या एका दौर्यात काँग्रेस तसेच उबाठा शिवसेनेतील काही पदाधिकार्यांना भाजपामध्ये आणले. त्यात प्रामुख्याने एकनाथ पवार, दत्ता कोकाटे (शिवसेना-उबाठा), बालाजी पांडागळे, शरद पवार (काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष) यांचा समावेश होता.
याच काळात आ.चिखलीकर यांनीही राष्ट्रवादीमध्ये भरती सुरू केली. खा.चव्हाण काँग्रेस पक्षाचे नेते असताना त्यांना मानणारे अविनाश घाटे आणि मोहन हंबर्डे हे माजी आमदारद्वय चिखलीकरांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत गेल्यानंतर आता चव्हाणांचे मेव्हणे, माजी खासदार भास्करराव खतगावकर तसेच माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा हेही राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. काँग्रेसच्याच माजी जि.प.अध्यक्ष वैशाली चव्हाण तसेच या पक्षाचे व्यंकटराव गोजेगावकर, शिवराज पाटील होटाळकर, स्वप्निल चव्हाण, बाळासाहेब रावणगावकर हे माजी जिल्हा परिषद सभापती राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहेत.
वरील वेगवेगळ्या भागांतील प्रमुख नेत्यांशिवाय लोहा-कंधार तसेच देगलूर, भोकर, नांदेड आदी तालुक्यांतील काँग्रेस व इतर पक्षांतील २ हजारांहून अधिक प्रमुख कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये दाखल करून घेत चिखलीकर यांनी खा.चव्हाण यांच्या नेतृत्वाला आव्हान दिल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. दीर्घकाळ अशोक चव्हाणांशी एकनिष्ठ राहिलेले कंधारचे माजी नगराध्यक्ष कल्याण सूर्यवंशी तसेच मोठे आर्थिक नुकसान झाल्यावरही चव्हाणांसमोर न डगमगलेले कंत्राटदार दादाराव ढगे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. उल्लेखनीय बाब म्हणजे शेकापचे माजी आमदार दिवंगत केशवराव धोंडगे यांचे पुत्र अॅड.मुक्तेश्वर यांनीही चिखलीकरांच्याच माध्यमातून नवा पक्षप्रवेश केला. त्यांच्या भगिनी चित्रा लुंगारेही याच पक्षामध्ये आहेत.
काँगे्रसचे माजी खासदार व ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या समर्थकांची व्यापक बैठक गुरुवारी शंकरनगर (ता.बिलोली) येथे पार पडली. जिल्ह्यातील एकंदर राजकीय परिस्थितीचा विचार करून खतगावकर यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षामध्ये प्रवेश करण्याचा मनोदय उपस्थितांसमोर व्यक्त केला. त्यास त्यांच्या समर्थकांनी एकमुखी पाठिंबा दिल्यामुळे खतगावकर, ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम नरसी येथे येत्या काही आठवड्यात घेण्याचे निश्चित झाले. विशेष म्हणजे या बैठकीस स्वतः चिखलीकर हजर होते.
( भास्करराव खतगावकर व आ.चिखलीकर )