सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जिल्ह्यातील चार माजी आमदार प्रवेश करण्याच्या तयारीत असून याबाबतची प्राथमिक चर्चा मिरजेतील एका बैठकीत झाली. विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी अनेक दिग्गज नेते पक्षात प्रवेश करतील, असे निशिकांत भोसले-पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
मिरजेत भोसले-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीस शिराळ्यातील माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, कवठेमहांकाळचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, आटपाडीचे माजी आमदार राजेेंद्रअण्णा देशमुख आदी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात राजकीय अस्वस्थता असून भाजपमधून बाहेर पडूनही अद्याप महायुतीशी संधान असलेल्यांना राजकीय पर्याय दिसत नव्हता. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळालेले मतदान लक्षात घेऊन आजही जिल्ह्यात असलेली पक्षाची ताकद पुनर्स्थापित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसले-पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर मिरजेत मातब्बर नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीपासून माध्यमांना दूर ठेवण्यात आले होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना पाठबळ देणे, पक्षाची ताकद निर्माण करणे, कार्यकर्त्यांना आश्वासक नेतृत्व देणे या बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेक मातब्बर इच्छुक आहेत. याबाबतही चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये मेळाव्याचे आयोजन करून दिग्गज नेत्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील चार माजी आमदारांसोबतच विधानसभा निवडणुका लढविलेले मात्र पराभूत झाले असले तरी लक्ष्यवेधी मतदान घेतलेले काही मातब्बर नेतेही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असून वेळ आल्यानंतर त्यांची नावे जाहीर होतील, असेही भोसले-पाटील यांनी सांगितले.