गाडीचे कागदपत्र तपासण्याच्या नावाखाली वाहनचालकांकडून पसे उकळले जात असल्याच्या कारणावरून पोलीस व जनतेत झालेल्या वादाचे पर्यवसान संतप्त जमावाकडून पोलिसांची मोटारसायकल जाळण्यात घडले. जमावाने पोलीस व्हॅनवर दगडफेक केली. या वेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी नागरिकांवर लाठीमार केला. पोलिसांच्या मारहाणीत चौघे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देवणी तालुक्यातील वलांडी येथे गुरुवारी हा प्रकार घडला. वलांडी येथे रस्त्यात अधूनमधून वाहने अडवून त्यांच्याकडून पसे उकळण्याचा पोलिसांचा धंदा चालतो. या प्रकाराने लोक त्रस्त झाले होते. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास वलांडी येथील रावसाहेब दत्तात्रय पाटील (वय ४२) यांची मोटारसायकल अडवून त्यांना कागदपत्रांची विचारणा केली. त्यांच्याकडे कागदपत्र नव्हते, या कारणावरून पोलिसांनी बाचाबाचीत पाटील यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार पाहून जमलेल्या जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली व मोटारसायकलही पेटवून दिली. पोलिसांनी तातडीने बाहेरून कुमक मागवली.
दरम्यान, वलांडी येथील शाळा, बाजारपेठ तातडीने बंद करण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपअधीक्षक अश्विनी शेलार यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. शुक्रवारी वलांडीत बाजारपेठ बंद ठेवून घटनेचा निषेध करण्याचे ठरले. देवणी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाची तातडीने बदली करावी, या मागणीची तातडीने दखल घेत पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर यांनी संबंधित निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली केल्याचे नागरिकांना सांगितले.

Story img Loader