बेमुदत उपोषणासाठी बसलेल्या बालवाडी शिक्षिकांपकी चौघींची प्रकृती बुधवारी खालावली. त्यांना छ. प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येऊन औषधोपचार करण्यात आले. दरम्यान उपोषणाची दखल जिल्हा प्रशासन घेत नसल्याने बालवाडी शिक्षिका, सेविकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
राज्य बालवाडी शिक्षिका व सेवक महासंघाच्या वतीने सोमवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बालवाडी शिक्षिका व सेविकांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून बालवाडी शिक्षिका सेविकांचा राज्य शासनाशी संघर्ष सुरू आहे. निवेदन, मोर्चा, धरणे आंदोलन या माग्रे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करूनही प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. यावर अखेरचा पर्याय म्हणून आता बेमुदत उपोषण सुरू केले आहे. काल उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी चार सेविकांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्यांची दोन वेळा वैद्यकीय तपासणीही केली होती.
गेली तीन दिवस उन्हाचा पाराही वाढत चालला आहे. तप्त ऊन्हात दिवसभर बसून राहणे त्रासदायक बनत आहे. याचा परिणाम प्रकृतीवर होऊ लागला आहे. विद्या बडवे, ज्योती म्हामूलकर, अंजली नवाळे, सविता वठारे या चार बालवाडी शिक्षिकांना बुधवारी रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने छ.प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना सलाईन लावण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना दवाखान्यातून  सोडण्यात आले.

Story img Loader