पंढरपूर : अधिक एकादशीनिमित्त पंढरीत सावळय़ा विठुरायाच्या दर्शनासाठी चार लाख भाविक दाखल झाले आहेत. शहरातील मठ, धर्मशाळा, लॉज भरले आहेत. तर मंदिर परिसर आणि शहरात भाविकांची गर्दी दिसून येत आहे. अधिक मासानिमित्ता पंढरीत रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत. तर, अधिक महिन्यातील एकादशीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले आहेत. या एकादशीला भाविक मोठय़ा संख्येने येतील म्हणून प्रशासनाने तयारी केली. यामध्ये मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना मोफत चहा, पाणी, नाश्ता देण्यात आला. खासगी वाहनासाठी पालिकेने वाहनतळ उभारण्यात आले आहे. तसेच मंदिर परिसर, नदी, दर्शनरांग आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, एकादशीनिमित्त पुण्यातील भाविक राम जांभूळकर यांनी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. एकादशीला पहाटे चंद्रभागा नदीचे स्नान, नगरप्रदक्षिणा करून भाविक पदस्पर्श दर्शन रांगेत उभे राहिले. दर्शनासाठी भाविकाला साधारणपणे आठ ते नऊ तास लागत होते. पावसाने उघडीप घेतल्याने भाविकांना दिलासा मिळाला आहे. एकीकडे राज्यात सर्वदूर पावसाने ओढे, नदीनाले भरून गेलेत. असे असले तरी पंढरीत अधिक मासातील एकादशीला भाविकांची गर्दी दिसून आली.