अलिबाग- कर्जत मधील एका खाजगी खाळेच्या बसमधील क्लिनर कडून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा घृणास्पद प्रकार करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
कर्जत तालुक्यातील एका शाळेत या मुली शिकत होत्या. पाच वर्षाच्या या मुली इतरांप्रमाणे शाळेच्या बसमधून दररोज प्रवास करत असत. या प्रवासा दरम्यान बसचा क्लिनर करण पाटील हा मुलींना बस चालकाच्या मागील सीटवर मुलींना बसायला सांगायचा नंतर तो त्यांच्याशी अश्लिल चाळे करायचा, मुलींनी ऐकले नाही तर त्यांना मारहाणही करायचा, गेली वर्षभर हा प्रकार सुरू होता. यातील एका मुलीने बसमधील हा क्लिनर कडून होणारा त्रास घरी पालकांना सांगितला. तेव्हा त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले आणि संबधित बस क्लिनर करण पाटील याच्या विरोधात तक्रार नोंदवली.
बसमधील आणखिन काही मुलींशी आरोपीने अश्लील चाळे केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विवीध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक लटपटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेबाबात कर्जत परिसरातून संताप व्यक्त केला जात असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. आरोपीच्या सहकाऱ्यांकडून पालकांवर गुन्हा दाखल करू नये यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोपही पिडीत मुलींच्या पालकांनी केला आहे.