सांगली : मोबाइलच्या दर्शनी काचेवरील संरक्षण कवचाच्या मूल्यावरून सांगलीत एकाचा चार अल्पवयीन मुलांनी भोसकून खून केल्याची, तर फूटबॉल खेळताना झालेल्या वादातून मिरजेत गावठी पिस्तुलातून गोळीबाराची घटना रविवारी घडली. या प्रकरणी सर्व संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, सांगली बस स्थानक परिसरात रविवारी दुपारी चौघेजण एका मोबाइल दुकानात खरेदीसाठी आले होते. या वेळी दुकानातील विक्रेता विपुलपुरी अमृतपुरी गोस्वामी (वय १९) याने संबंधित वस्तूची किंमत शंभर रुपये सांगितली. त्यावरून झालेल्या वादात विक्रेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत एकाने कोयत्याने वार केले, तर दुसऱ्याने चाकूने पोटात, पाठीत वार केले. यात गंभीर जखमी होऊन विपुलपुरी जागीच ठार झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुकानातील सीसीटीव्हीवर चित्रित झालेल्या चित्रफितीवरून संशयितांचा शोध घेऊन चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असल्याचे शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सोमवारी सांगितले. भर दिवसा वर्दळीच्या दुकानात खुनाचा गुन्हा घडल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाबाबत सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, दुसरीकडे मिरजेतील रविवारी रात्री इसापुरे गल्लीत गोळीबाराची घटना घडली. फूटबॉल सामन्यावेळी झालेल्या वादावादीनंतर जाब विचारण्यासाठी काही मुले गेली होती. या वेळी एकाने गावठी पिस्तुलामधून दोन गोळ्या हवेत झाडल्या. यामुळे जाब विचारण्यास आलेले तरुण परागंदा झाले असले, तरी भर वस्तीत हा प्रकार घडल्याने नागरिक भयभीत झाले होते. गोळीबाराची घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला गावठी पिस्तुलासह अटक केली असल्याचे पोलीस निरीक्षक श्री. रासकर यांनी सांगितले. याप्रकरणी दस्तगीर शौकत बावा याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून ४० हजारांचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four minors stabbed man in sangli over mobile cover while pistol firing occurred in mirjeet gavathi sud 02