लोकसत्ता वार्ताहर
नांदेड : उत्तरप्रदेशातील बाराबांकी जिल्ह्यातून जाणार्या महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेत नांदेडमधील १३ प्रवासी जखमी झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
नांदेड व परिसरातील काही भाविकांना घेऊन एक टेम्पो ट्रॅव्हलर बस अयोध्येला जात होती. ही बस बाराबांकी जिल्ह्यातील पूर्वांचल एक्सप्रेस हायवेवरून जात असताना याच रस्त्यालगत नादुरूस्त अवस्थेत उभ्या असलेल्या बसवर आदळून अपघात झाल्याचे सांगण्यात आले. टेम्पो ट्रॅव्हलरमधील सुनील दिगंबर वरपडे (वय ५०), अनसुया दिगंबर वरपडे (वय ८०) आणि दीपक गणेश गोदले (वय ४०) हे नांदेडमधील आणि वसमत तालुक्यातील जयश्री चव्हाण (वय ५०) असे चौघेजण मरण पावले.
या अपघातात १३ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर तेथे उपचार करण्यात आले. वरील दुर्घटना लोणी कटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याची माहिती येथे देण्यात आली. अपघातातील बहुसंख्य प्रवासी नांदेडच्या छत्रपती चौक परिसरातील राहणारे होते. या दुघटनेची माहिती येथे आल्यानंतर वरील परिसरात शोककळा पसरली.