सांगली : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चार जावई आमदार झाले असून यापैकी दोन आमदार मिरज तालुक्यातील म्हैसाळच्या शिंदे सरकारच्या वाड्यातील आहेत. तर एक जावई बेडग (ता. मिरज) व एक मांजर्डे ( ता. तासगाव) येथील आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे आठव्यांदा इस्लामपूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. तसेच शिराळा मतदारसंघातून भाजपचे सत्यजित देशमुख हे निवडून आले आहेत. आ. पाटील यांच्या पत्नी शैलजा आणि आ. देशमुख यांच्या पत्नी रेणुका देवी या दोघीही म्हैसाळमधील माजी आमदार मोहनराव शिंदे यांच्या कन्या आहेत. त्यामुळे म्हैसाळचे एकाच घरातील दोन जावई आमदार झाले आहेत.
तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून बीड जिल्ह्यात निवडून आलेले धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांचे माहेर बेडग (ता. मिरज) येथील आहे. मुंडे हे बेडगचे जावई आहेत. शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शंभूराज देसाई हे मांजर्डे (ता. तासगाव) येथील जावई आहेत. तेही निवडून आले आहेत. तर याच गावचे जावई असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाले आहेत. तांबवे (ता. वाळवा) येथील जावई बाळासाहेब थोरात हेही पराभूत झाले आहेत.