नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील गेल्या दोन वर्षांतील चार वाघांच्या स्थलांतरणाने कॉरिडॉर आणि वाघांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. स्वयंसेवींच्या सतर्कतेमुळे हे चारही स्थलांतरण लक्षात आल्याने या दरम्यान वाघांवर लक्ष ठेवता आले. मात्र, या स्थलांतरणादरम्यान शिकार, रस्ते अपघात, विषप्रयोग, वीजप्रवाह वाघांच्या जीवावर बेतण्याचीही शक्यता होती. त्यामुळे कॉरिडॉर आणि वाघांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनखाते काय पावले उचलणार, असा प्रश्न या व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.
या व्याघ्र प्रकल्पातून वाघ स्थलांतरण करून जात असले तरीही स्थलांतरण करून येणाऱ्या वाघांची मात्र नोंद नाही. मुळातच या व्याघ्र प्रकल्पात वाघ फार काळ स्थिरावत नाही. २००२ पासून आतापर्यंत या व्याघ्र प्रकल्पात १५-२० वाघांच्या बछडय़ांनी जन्म दिला. मात्र, ते कुठे गेले, त्यांचे काय झाले, याची कोणालाही कल्पना नाही. २०११-१२ च्या गणनेत आठ वाघ आणि २०१३ मध्ये केवळ पाच वाघ शिल्लक राहिले. या बछडय़ांचेसुद्धा स्थलांतरण आणि स्थलांतरणादरम्यान शिकार वा अन्य कारणांनी त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आजही नागझिरा, न्यू नागझिरा आणि कोका अभयारण्य मिळून सुमारे १५-२० वाघ आरामात या ठिकाणी वास्तव्य करू शकतात. तरीही वाघाच्या या परिसरातून स्थलांतरणामागील कारणांचा शोध घेणे आता अत्यावश्यक झाले आहे. त्यासाठी या परिसराचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास होणे अत्यंत गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांतील तीन वाघ आणि एका वाघिणीच्या स्थलांतरणादरम्यान त्यांनी राष्ट्रीय महामार्ग, धरण, रेल्वेमार्ग, राज्य महामार्ग ओलांडून शेकडो किलोमीटरचा प्रवास केला. या दरम्यान ते सुरक्षित राहिले, ही बाब समाधानकारक असली तरीही प्रत्येक वेळी ते शक्य होईलच, असे नाही.
‘कानी’ या वाघिणीच्या स्थलांतरणात मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर यांच्यासह सेवा संस्थेचे अंकित ठाकूर, चेतन जासानी, शशांक लाडेकर, राहुल हारोडे, दुष्यंत आकरे, शाहीद खान आणि डब्ल्युटीआय या संस्थेचे अनिल कुमार यांनी कॅमेरा ट्रॅप आणि इतर माध्यमातून वाघांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली. त्यामुळे हे स्थलांतरण सुरक्षित झाले. या स्वयंसेवींच्या सतर्कतेला क्षेत्र संचालक संजय ठवरे, विभागीय वनाधिकारी अशोक खुणे, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, वनरक्षक पारधी यांनी तेवढेच सहकार्य केले. तरीही वनखात्याला  आता वाघांच्या स्थलांतरणामागचा शोध आणि या क्षेत्रातील त्यांच्या अस्थिरतेमागील कारणांचा शोध घेणेही तेवढेच आवश्यक आहे, तरच या व्याघ्र प्रकल्पात वाघ सुरक्षित राहू शकतील, असे मत वन्यजीवतज्ज्ञांनी व्यक्त केले.

Story img Loader